पुणे : बिबवेवाडीकरांची दमछाक ! रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू | पुढारी

पुणे : बिबवेवाडीकरांची दमछाक ! रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू

बिबवेवाडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संविधान चौक ते अप्पर डेपोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. परिसरातील विकासकामे मुदतीत पूर्ण झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी रस्त्यावर चालताना रहिवाशी, नागरिकांची दमछाक होते. महापालिका प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
परिसरातील दोन महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवल्यामुळे या ठिकाणी असलेल्या दुकानांकडे ग्राहक फिरकत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. चैत्रबन झोपडपट्टी ते जिव्हेश्वर सहकारी गृहरचना संस्था दरम्यानचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागते आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे ’रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी स्थिती  निर्माण झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
संविधान चौक ते अप्पर डेपो येथील कामास थोडा उशीर झाला आहे. ड्रेनेज व पावसाळी लाइन, भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामातील अडथळ्यामुळे या कामास विलंब होत असून, नागरिकांनी सहकार्य करावे. आगामी दिवसांत हे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल.
-अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, महापालिका.
जिव्हेश्वर सहकारी गृहरचना संस्थेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आम्ही वारंवार महापालिकेकडे केली आहे. मात्र, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करीत आहेत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी.
-विजय कांबळे, रहिवासी, बिबवेवाडी.
हेही वाचा

Back to top button