Ajit pawar vs Sharad pawar : चेतन तुपे यांच्या भूमिकेने संभ्रम; कधी शरद पवार, तर कधी अजित पवारांसोबत | पुढारी

Ajit pawar vs Sharad pawar : चेतन तुपे यांच्या भूमिकेने संभ्रम; कधी शरद पवार, तर कधी अजित पवारांसोबत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे आमदार तुपे नक्की कोणासोबत हा संभ्रम आणखी वाढला आहे. विशेष म्हणजे तुपे याबाबत थेट भूमिका स्पष्ट करीत नसल्याने या संभ्रमात आणखीच भर पडत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पुणे शहरातील दोन आमदारांपैकी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी लगेचच भूमिका स्पष्ट करून अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हडपसरचे दुसरे आमदार चेतन तुपे हे नक्की कोणाबाबत आहेत हे अद्यापही स्पष्ट व्हायला तयार नाही.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकाच दिवशी मुंबईत आमदारांची बैठक बोलविली होती. त्यावेळेस तुपे यांनी थेट मोठ्या पवारांच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे ते शरद पवार यांच्या समवेत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर दुसर्‍या- तिसर्‍या दिवशीच ते अजित पवारांच्या भेटीला पोहचले होते. त्यावर त्यांनी कामानिमित्त भेट घेतल्याचे सांगितले होते. मध्यंतरी शरद पवार यांच्या हडपसरमधील एका कार्यक्रमालाही ते उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत ते उपचारासाठी रुग्णालयात असल्याने दोन्ही गटांपासून लांबच राहिले. त्यातच हडपसरमध्ये आमदार तुपे हे मोठ्या पवारांसोबत असल्याचे फलक झळकले. मात्र, ते फलक त्यांनी लावले नसल्याचे सांगितले गेले. त्यातच सोमवारी हडपसरमध्ये माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार तुपे यांनीही हजेरी लावली आणि पवार यांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी बैठकही ठोकली. एकीकडे राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करीत आहेत. अशात आमदार तुपे मात्र कधी शरद पवार, तर अजित पवार यांच्या समवेत दिसत असल्याने ते नक्की कोणासोबत आहे, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा ‘तो’ पिलर पाडला; मनसेने वाहिली पिलरला श्रद्धांजली

पुणे : केवळ एकाच ढोल पथकाने घेतली परवानगी; मैदानांवरील पथकांना पालिका देणार नोटीस

पुणे शहरात 14 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई

Back to top button