पुणे : केवळ एकाच ढोल पथकाने घेतली परवानगी; मैदानांवरील पथकांना पालिका देणार नोटीस

पुणे : केवळ एकाच ढोल पथकाने घेतली परवानगी; मैदानांवरील पथकांना पालिका देणार नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मालकीच्या जागेत वादन सराव करणार्‍या पथकांची संख्या मोठी असताना एरंडवणा येथील केवळ एका पथकाने सरावासाठी महापालिकेची परवानगी घेतली आहे. दरम्यान, सणस मैदानासह महापालिकेच्या इतर मैदानांवर वादन सराव करणार्‍या ढोल पथकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने ढोल-ताशा पथकांचा वादन सराव शहराच्या विविध भागांत सुरू आहे. यामध्ये मोकळ्या जागा, नदीपात्र यासह इतर ठिकाणांचा समावेश आहे.

शासकीय जागांसह खासगी जागांमध्येही सराव सुरू आहेत. खासगी जागांसाठी जागामालकांची परवानगी घेतली जाते. मात्र, शासकीय जागांवर सराव करण्यासाठी परवानगी घेतली जात नाही. शासकीय जागांवर थेट घुसखोरी करून सराव सुरू केला जाते. अधिकार्‍यांनी मज्जाव केल्यानंतर नेत्यांना फोन लावून दबाव टाकला जातो. मात्र, एरंडवणा येथील एका पथकाने वादन सरावासाठी रितसर परवानगी घेतली आहे.

दुसरीकडे सणस मैदान खुले करावे म्हणून खेळाडू, पालक, प्रशिक्षकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. असे असताना काही ढोल पथकांनी तर थेट सणस मैदान आणि नेहरू स्टेडियमजवळील मोकळी जागा, कबड्डी मैदान येथे शेड उभे करून सराव सुरू केले आहेत. ढोल पथकाच्या वादनासाठी प्रशासनाकडून परवानगी दिली जात नाही, गेटला कुलूप लावल्याने भाजयु मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कुलूप तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर मैदानांवर आणि महापालिकेच्या मोकळ्या जागांवर वादन सराव करणार्‍या पथकांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

कुलूप तोडणार्‍यांना पोलिसांनी दिली समज

वादन सरावासाठी गेटचे कुलूप तोडणार्‍या भाजयु मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात प्रशासनाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार केली
होती. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना बोलावून समज दिल्याचे व कार्यकर्त्यांनी नुकसानभरपाई देण्याचे मान्य केल्याची माहिती क्रीडा अधिकार्‍यांनी दिली आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनी माहितीच पाठवली नाही

महापालिकेच्या मिळकतींमध्ये व मोकळ्या जागांवर वादन सराव करणार्‍या ढोल पथकांची माहिती पाठवण्याचे आदेश मालमत्ता विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांनी माहितीच पाठवली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news