दुचाकीची एसटी बसला धडक 1 ठार; 2 जखमी | पुढारी

दुचाकीची एसटी बसला धडक 1 ठार; 2 जखमी

सासवड : पुढारी वृत्तसेवा : एस.टी.बसला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील एकजण ठार झाला, तर दोघे गंभीर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामती आगाराची बस (एमएच 14 बीटी 4637) मुंबई येथून बारामतीकडे जाताना रविवारी (दि. 27) दुपारी झेंडेवाडी येथील आरटीओ कार्यालयाच्या बाजूने आलेल्या मोटारसायकलला (एमएच 12 डीएल 2156) एसटी बसची धडक बसली. यामध्ये मोटारसायकलवरील ऋषिकेश जिजाबा खराडे (रा. हडपसर) हा जागीच ठार झाला, तर दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हडपसर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुणे- पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे, तेथील मागील सहा महिन्यातील हा दुसरा अपघात आहे.

पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक, गतिरोधक नाही. नवीन वाहनचालकांना अंदाजच येत नाही. आरटीओ कार्यालयाच्या बाजूने येणारी वाहने थेट महामार्गावर येत असल्याने सातत्याने अपघात होत असूनही या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. प्राधिकरण आणखी किती निष्पापांचा बळी जाण्याची वाट पाहतंय, असादेखील प्रश्न आता संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.

Back to top button