पुणे : लोहगाव-वाघोली रस्त्याचे काम निकृष्ट | पुढारी

पुणे : लोहगाव-वाघोली रस्त्याचे काम निकृष्ट

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकतेच करण्यात आलेले लोहगाव-वाघोली रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार माहिती सेवा समितीने केली होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारासह या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याची दुरुस्ती करून कामातील त्रुटी भरून काढल्या जातील तसेच पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीचे काम ठेकेदारमार्फत केले जाणार असल्याची या वेळी अधिकार्‍यांनी दिली.
संतनगर ते दादाची वस्ती दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पाहणी  सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एकच्या सहायक अभियंता जान्हवी रोडे व अभिमन्यू जमाले यांनी नुकतीच केली. माहिती सेवा समितीच्या माध्यमातून सागर खांदवे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाविषयी गेल्या चार महिने पाठपुरावा केला. तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणही करण्यात आले. त्याची दखल घेत रोडे व जमाले यांनी रस्त्याची पाहणी
केली व हे काम निकृष्ट झाल्याचे मान्य केले.
रोडे यानी  ठेकेदाराचे 3.5 कोटी रुपयांचे बिल थांबविले असून, ठेकेदाराला पॅचवर्कसह दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. माहिती सेवा समितीने यास विरोध करून निविदेप्रमाणे संपूर्ण रस्ता पुन्हा नव्याने बनविण्याची मागणी केली आहे.
सरकारतर्फे चौकशी सुरू आहेच. परंतु, मागणी मान्य न झाल्यास समितीचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे या वेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले. समितीचे जिल्हा सरचिटणीस सागर खांदवे, मधुकर खांदवे, नवनाथ खांदवे, सुमीत खांदवे, सनी  खांदवे यांच्यासह नागरिक या वेळी उपस्थित होते.
या रस्त्याचे काम नियमाप्रमाणे झाले आहे. मात्र, त्यावर रहदारी अधिक आहे. तसेच काँक्रिटीकरण केल्यानंतर हा रस्ता  वाहतुकीस लगेच खुला करण्यात आल्याने त्यास अधिक दिवस पाणी मिळाले नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.  ठेकेदाराला अद्याप साडेतीन कोटी रुपये बिल अदा केले नाही. त्याच्याकडून पॅचवर्कसह इतर कामे करून घेतली जातील. समिती गठित करून या रस्त्याच्या कामाची चौकशी केली जाईल.
                                                        – जान्हवी रोडे, सहायक अभियंता, सार्वजनिक  बांधकाम विभाग 
हेही वाचा :

Back to top button