कामगाराने बनावट बिलं तयार करून घातला 17 लाखांचा गंडा | पुढारी

कामगाराने बनावट बिलं तयार करून घातला 17 लाखांचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मालाची बनावट बिलं तयार करून कामगाराने मालकाला तब्बल 17 लाख 15 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिलीप अतुलचंद लोणकर (रा. पद्मावती) याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यावसायिक आकाश मेहता (वय 38, रा. लुल्लानगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेहता यांचा महादेवनगर हिंगणे खुर्द येथे पार्श्वनाथ एंटरप्रायजेस नावाने व्यवसाय आहे. आरोपी लोणकर हा त्यांच्याकडे काम करतो.

लोणकरने गणपत सुपर मार्केट अँड शुगर टी ऑईल डेपो यांना माल न देता, त्यांच्या नावाची बिले तयार केली. त्यांना माल दिला आहे, असे भासवून बिलावर खोटे सही-सिक्के मारले. त्यानंतर तो माल दुसर्‍या व्यक्तींना विक्री करून इतर काही दुकानदार यांच्याकडून दिलेल्या मालाची रक्कम घेऊन स्वतःकडे ठेवली. हा प्रकार फिर्यादींना समजल्यानंतर त्यांनी लोणकरकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ करून फिर्यादींची 17 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केली. बिलामध्ये लोणकरने हेराफेरी करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Tomato Prices | टोमॅटोची लाली उतरली; दर प्रतिकिलो २०० रुपयांवरून थेट १४ रुपयांवर

Remote control car : रिमोट कारचा प्रथम विश्वविक्रम, नंतर भयंकर स्फोट!

Back to top button