कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन मुले जखमी | पुढारी

कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन मुले जखमी

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  चंदननगर-खराडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, दोन लहान मुलांना त्यांनी चावा घेतला. यामध्ये ही मुले जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवराज मयूर झेंडे (वय 4), साई किशोर ससाणे (वय 4),अशी या मुलांची नावे आहेत. तसेच राजाराम पाटीलनगरमधील बारावीत शिकणारा मुलगा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
चंदननगर येथील कल्याणी हॉस्पिटल परिसरातील शिवराज याला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (दि.23) रात्री घडली.

यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या पाठीला, पायाला, तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. साई याच्यावरदेखील कुत्र्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. राजाराम पाटीलनगर खराडीमधील बारावीत शिकणार्‍या मुलाच्या पायालाही भटक्या कुत्र्याने चावा घेतला आहे. शिवराजचे पालक मयूर झेंडे म्हणाले, ’वडगावशेरी, चंदननगर परिसरातील भटक्या कुर्त्यांनी अनेक लहान बालकांना हल्ला करून जखमी केले आहे. श्वान पथक आले की, कुत्री पळून जातात आणि प्राणिमित्रही कुत्री पकडण्यास आलेल्यांना विरोध करत आहेत.

भटक्या कुत्र्यांची दहशत

या घटनांमुळे परिसरातील मुले घाबरली आहेत. खराडी-चंदननगरातील भटक्या कुत्र्यांच्या महापालिका प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी केली आहे. परिसरातील लहान मुले शाळेतील विद्यार्थी महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर जाऊन चावा घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात या भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे.

चंदननगर भाजी मडंई परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असून, जखमी मुलांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पाहणी केली आहे. येत्या दोन दिवसांत परिसरातील मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्त केला जाईल.
                                                 -स्वाती घनवट, वैद्यकीय अधिकारी.

Back to top button