पुणे : पुढारी वृत्तसेवा : जन्माने अमेरिकी नागरिक असलेल्या मुलीच्या शिक्षणासाठी वडिलांचे कामासाठी पुन्हा अमेरिकेत जाण्याचे प्रयत्न सुरू होते. मुलीला वडिलांबरोबर अमेरिकेत जायचे होते, मात्र पत्नीला परत जायचे नव्हते. यादरम्यान स्वयंपाक घरात एक अघटित घटना घडली अन् आईवर पोटच्या गोळ्याच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयाच्या सहा वर्षांच्या लढाईनंतर तो अपघात असल्याचे निष्पन्न झाले अन् आईच्या माथ्यावरील चिमुकलीच्या खुनाचा कलंक अखेर मिटला.
याप्रकरणातील, श्वेता (वय 38) व संतोष (वय 41) दोघेही उच्चशिक्षित असून, 30 जून 2009 रोजी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर नोकरी निमित्ताने दोघेही अमेरिकेत गेले होते. यादरम्यान, 2013 रोजी अमेरिकेत त्यांना मुलगी झाली. तिच्या जन्मानंतर ते जवळपास 6 वर्षे अमेरिकेत होते. त्यानंतर ते भारतात परतले. मुलगी जन्माने अमेरिकन नागरिक असल्याने तिच्या शिक्षणासाठी संतोष यांना सहकुटुंब पुन्हा अमेरिकेत जायचेच होते. कंपनीतर्फे पुन्हा अमेरिकेत जायचे निश्चित झाल्यांतर त्यांनी ते पत्नीस सांगितले. या वेळी त्यांनी आम्ही दोघी येणार नाही, तुम्ही एकटेच जावा, असे सांगितले. परंतु, छोट्या मुलीला अमेरिकेत जाण्याची इच्छा होती. याप्रकरणात, श्वेता हिच्या कुटुंबीयांनीही तिला समजावून सांगत अमेरिकेत जाण्याची विनंती करीत होते. तर, सहा वर्षांची चिमुकलीही अमेरिकेला पप्पांबरोबर जाऊ, असे म्हणत होती.
घटनेच्या दिवशी संतोष याने विमानतळावर जात सासरच्यांना श्वेता व मुलीस घेऊन येण्यास सांगितले. त्यादिवशी, बाथरूममध्ये जाण्याचा बहाणा करून चिमुकलीला सहकारनगर पुणे येथील तिच्या काकांच्या घरात नेले. स्वयंपाकगृहामध्ये जाऊन आतून दरवाजा बंद केला. स्वयंपाकगृहामध्ये छोट्या मुलीच्या दोन्ही हाताच्या नसा सुरीने कापल्या व तिचा खून केला, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. श्वेताच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी युक्तिवाद केला. श्वेता व संतोष यांचा घटस्फोट झाला आहे. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्यासाठी खुनाचा खोटा आरोप केला आहे. मुलगी खेळताना लोखंडी रॅकवरून खाली पडली. व त्यात तिचा मृत्यू झाल्याचा युक्तिवाद अॅड. पवार यांनी केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या न्यायालयाने तो मान्य करीत पुराव्याअभावी आईची निर्दोष मुक्तता केली.
हेही वाचा :