कमी पैशात, कमी वेळेत; मेट्रोने भुर्रर्र..! पुणेकरांची मेट्रोला वाढू लागली पसंती | पुढारी

कमी पैशात, कमी वेळेत; मेट्रोने भुर्रर्र..! पुणेकरांची मेट्रोला वाढू लागली पसंती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ’मी येरवड्याच्या आयटी कंपनीत काम करतो. राहतो कोथरूडला. आधी मी कारनं कामाला जायचो. महिन्याला तीन-साडेतीन हजार रुपये लागायचे अन् त्यापेक्षा पाऊण तासाचा वेळ. आता मेट्रोनं हजार रुपयांत आरामात प्रवास करतो अन् कोर्टाजवळ मेट्रो बदलावी लागली तरी त्यापेक्षा निम्म्या वेळेत पोहोचतो…’, ’मी फर्ग्युसन कॉलेजला शिकते. रोज टू व्हीलरने पौड फाट्यापासून कॉलेजला जायचे. आता फिडर बसने मेट्रो स्टेशनला येते अन् तिथून डेक्कनला उतरते…’ मेट्रोचे पहिले दोन मार्ग अजून पूर्णपणे सुरू झालेले नसले तरी जे काही मार्ग झाले आहेत त्यांचा वापर पुणेकरांच्या हळूहळू अंगवळणी पडू लागल्याची ही आहेत दोन प्रातिनिधीक उदाहरणे. एक आहेत निरंजन भुर्के जे येरवड्याच्या आयटी पार्कमध्ये काम करतात.
त्यांच्याकडे मोठी एसयूव्ही कार असल्याने मेट्रो होण्याआधी कोथरूड ते येरवडा प्रवासासाठी सात-आठ हजार रुपये महिन्याला खर्च येत असे, पण खर्च वाचण्यापेक्षा कमी वेळेत आणि प्रदूषणमुक्त वातावरणात कंपनीत पोहोचतो, या फायद्याला ते अधिक महत्त्व देतात. दुसरी आहे महाविद्यालयीन तरुणी. टीम ’पुढारी’ने गेले दोन दिवस मेट्रोच्या मार्गांवरील वेगवेगळ्या टप्प्यांचा प्रवास केला आणि पुणेकर मेट्रो प्रवाशांशी भरपूर संवादही साधला. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली. तशाच प्रवाशांनी अनुभवावर आधारित केलेल्या सूचनाही मिळाल्या.
वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि पुढे पिंपरी… पौड फाट्यावरील वनाज स्टेशनपासून मेट्रोचा मार्ग सुरू होतो. सकाळी कामाला जाण्याच्या वेळेत म्हणजे साडेदहाच्या सुमाराला स्टेशनच्या दारात पोहोचलो तर दारातच पीएमपीची फीडर बस उभी होती. दारातच उभे असलेले वाहक बोलके अन् उत्साही होते. कोथरूड परिसर बराच मोठा असल्याने वेगवेगळ्या कोपर्‍यांत राहणार्‍या कोथरूडकरांना मेट्रो स्टेशनपर्यंत आणण्याची सेवा देण्याची जबाबदारी येते ती या फीडर बससेवेवर. त्यासाठी पीएमपीचे तीन मार्ग आहेत. पौडफाट्याच्या उजव्या बाजूला असलेल्या कोथरूड गावठाण, कुंबरे पार्क, सहजानंद सोसायटी, कोथरूड स्टँड, सुतार दवाखाना, महात्मा सोसायटीसाठी एक मार्ग, तसेच बावधन, भुसारी कॉलनी भागातून येणार्‍यांसाठी दुसरा मार्ग, तर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या मयूर कॉलनी, शिवतीर्थनगर या भागासाठी तिसरा मार्ग. सकाळी गर्दीच्या वेळी दर वीस मिनिटांनी ही बससेवा असते. तर गर्दी कमी झाल्यावर चाळीस मिनिटांनी दुसरी फेरी होते. या बससेवेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांची संख्या आता वाढू लागली आहे.
मेट्रो स्थानकावर सिव्हिल कोर्टाचे तिकीट काढले अन् प्लॅटफॉर्मवर गेलो तर पहिला धक्का बसला. सार्वजनिक बससेवा असलेल्या पीएमपीची बस कधीही वेळेवर येण्याची आणि तिच्या येण्याची वेळ आधी कळण्याची सवय पुणेकरांना नाही, त्यामुळे पुढच्या दोन मेट्रोच्या वेळा नऊ मिनिटांनी आणि सतरा मिनिटांनी अशा पडद्यावर झळकलेल्या पाहून आनंदाचे भरतेच आले. त्याच अचूक वेळेला मेट्रो स्थानकात येऊन उभे राहिलो अन् दरवाजे उघडले गेले. चार डब्यांच्या त्या मेट्रोच्या प्रत्येक दाराजवळ गर्दी झाली होती, पण आतले प्रवासी बाहेर येण्यासाठी अन् बाहेरचे आत जाण्यासाठी एक मिनिटाचा अवधी पुरला. त्यानंतर दरवाजे बंद होत असल्याची घोषणा झाली अन् मेट्रोने गती घेतली… त्यापुढच्या आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे महाविद्यालय, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे मनपा अशी स्थानके घेत सिव्हिल कोर्ट स्थानकावर मेट्रो आली अन् टीम ‘पुढारी’ खाली उतरली.
मेट्रो सोळा मिनिटांत वनाजपासून निघून कर्वे रस्ता ओलांडून, नदीपात्रातून कोर्टापर्यंत पोहोचली अन् तेही प्रवाशांच्या पोटातले पाणीही हलू न देता, वातानुकूलन यंत्रणेचा सुखद गारवा अनुभवत असताना. काही स्थानकांवर मेट्रोत चढणारे प्रवासी कमी होते, तिथे मेट्रोची दारे अवघ्या काही सेकंदांमध्ये बंद होत होती. सिव्हिल कोर्ट स्थानकावर उतरल्यावर पिंपरीकडे  जाण्यासाठी दुसर्‍या मार्गावरील मेट्रोकडे जाणे आवश्यक होते. हा दुसरा मार्ग पिंपरी-सिव्हिल कोर्ट-मंडई-स्वारगेट असा नियोजित असून, त्यापैकी पिंपरी ते सिव्हिल कोर्ट एवढा भाग पूर्ण झाला आहे. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे मार्ग सिव्हिल कोर्ट येथे एकत्र येत असल्याने सिव्हिल कोर्ट स्थानक प्रशस्त करण्यात आले आहे. तेथे दुचाकी आणि चारचाकी वाहन पार्किंगची भरपूर व्यवस्थाही करण्यात आली आहे.
त्यासाठी जमिनीखाली दोन मजले उतरून जावे लागते. त्यासाठी सरकते जिने, साधे जिने आणि लिफ्ट अशी तिहेरी व्यवस्था असल्याने कितीही गर्दी असली तरी अडचण येणार नाही, हे जाणवले. पिंपरी मार्ग असा फलक वाचून जिने उतरत थेट प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तर मेट्रो येऊन उभी राहिलेली दिसली. मात्र, त्यासाठी लागणार्‍या तिकिटाची खिडकी वाटेत कुठेच नव्हती. चौकशी केल्यावर जमिनीवरील मजल्यावर तिकीट खिडकी असल्याचे सांगण्यात आले. तिकीट न काढताच पिंपरीच्या मेट्रोत बसून जाता आले असते, पण तिथून बाहेर पडण्यासाठी तिकीटच लागणार असल्याने बाहेर पडता आले नसते. मात्र, आल्या पावली परत येऊन मूळ वनाज ते सिव्हिल कोर्ट तिकीट दाखवून बाहेर पडता आले असते. ही यंत्रणेतली त्रुटी आहे का, असा प्रश्न तिथल्या कर्मचार्‍याला केला असता, त्याला उत्तर देता आले नाही.
अखेरीस वरच्या मजल्यावर जाऊन तिकीट काढले. आणखी एक गोष्ट तिथे लक्षात आली. दुचाकी पार्क करून बोगद्यातील स्टेशनच्या पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर तिकीटघर आहे. मात्र, तुम्ही जर यूपीआय वापरून तिकिटाचे पैसे देणार असाल तर ते येथे शक्य नाही. कारण तिकीटघराजवळ मोबाईल नेटवर्क मिळत नाही. परिणामी, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे शक्य होत नसल्याने अडचण होते. मग पर्याय काय, तर रोख किंवा तुमच्याकडील डेबिट कार्डद्वारे तुम्हाला तिकिटासाठी पैसे द्यावे लागतील. याबाबत तिकीट देणार्‍या व्यक्तीला विचारले असता, ‘पहिल्या दिवसापासून ही समस्या जाणवत आहे. त्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही, त्यामुळे तुम्ही कार्डद्वारे पैसे देऊ शकता,’ समोरील व्यक्तीने ध्वनिक्षेपकातून सांगितले.
तिकीट घेतल्यानंतर तिकीट स्कॅन न करता निघालेल्या व्यक्तींना स्वयंचलित अडथळा निर्माण होतो. त्यावर तिथे उपस्थित सुरक्षारक्षक तुम्हाला तिकीट स्कॅन करण्यास मदत करतो. ‘हे असे अनेकांना जोरात लागले आहे का?’ असे विचारल्यानंतर सुरक्षारक्षक म्हणाला, ‘अनेकजण घाईत येतात, तिकीट स्कॅन न करता गडबडीत पुढे गेल्यानंतर या स्वयंचलित पट्ट्या धाडकन लागतात. त्यासाठी आम्ही मदतीला असतोच.’ प्रत्येक दहा मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानकापासून पिंपरीसाठी मेट्रो निघते. सिव्हिल कोर्ट स्थानकावरून 12 वाजून 37 मिनिटांनी मेट्रो हलली. दोन मिनिटांत शिवाजीनगर, नऊ मिनिटांत म्हणजे 12.46 ला बोपोडी, 12.49 ला दापोडी, 12.52 ला फुगेवाडी, 12.55 ला कासारवाडी, 12.58 ला नाशिक फाटा असे करत त्यानंतर काही मिनिटांत पिंपरीला पोहोचलो. रोज वीस ते एकवीस मिनिटांत सिव्हिल कोर्टापासून ते पिंपरीपर्यंत पोहोचण्यास लागतात, असे रोज पिंपरीला कामाला जाणार्‍या एका कर्मचार्‍याने सांगितले. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर बसलेला सृजन शेळके म्हणाला, ‘माझे कॉलेज शिवाजीनगरजवळच असल्याने मला मेट्रो अतिशय सोईस्कर ठरत आहे. घरापासून पिंपरी स्टेशनपर्यंत सायकलने येतो. माझे भोसरीचे मित्रदेखील सोबत असतात, पण आज ते दोघे कागदपत्रांचे काम पूर्ण करण्यासाठी थांबले आहेत.’ प्रत्येक स्टेशन आल्यानंतर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये दरवाजा कुठल्या बाजूने उघडणार आहे,
दरवाजा बंद होणार आहे, काळजी घ्या, 
दरवाजापासून लांब उभे राहा, अशा सूचना सुरू होत्या. मेट्रोमध्ये आपण कोणत्या स्टेशनवर आहोत, कुठं प्रवास करतोय हे समजण्यासाठी मराठीतून इलेक्ट्रिक बोर्ड लावण्यात आले आहेत. मनपा स्थानक ते रुबी हॉल स्थानक आणि परत… सिव्हिल कोर्ट स्थानकावर मोठी गर्दी… संध्याकाळची वेळ असल्याने वनाजपासून मनपा स्थानकावर आलेल्या मेट्रोमध्ये फारशी गर्दी नव्हती. मनपा येथे पंधरा-वीस प्रवाशांची भर पडली. कोथरूड परिसरातून आलेल्या बहुसंख्य म्हणजे जवळपास पंचाहत्तर टक्के प्रवाशांना सिव्हिल कोर्टापर्यंत जायचे होते, त्यामुळे मेट्रोतली प्रवासीसंख्या त्या स्थानकावर एकदम कमी झाली. पुढे मंगळवार पेठ आणि रेल्वे स्टेशन स्थानकावर फारसे प्रवाशी उतरलेली नाहीत आणि चढलेही नाही.
मात्र, रुबी हॉल स्थानकावर संपूर्ण प्रवासी उतरले. स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील आऊट गेटवर तिकीट स्कॅन करून बाहेर पडणार्‍यांची जेवढी संख्या होती, त्याहून अधिक प्रवाशांची गर्दी तिकीट काढण्यासाठी आणि काढलेले तिकीट स्कॅन करण्यासाठी होती. एक मेट्रो निघून गेल्यानंतर दुसरी येईपर्यंत रूबीच्या पहिल्या मजल्यावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली होती. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. दुसर्‍या बाजूला स्वयंचलित मशिनवर मोबाईलद्वारे तिकिटे काढणार्‍यांचीही झुंबड सुरू होती. एकंदरीत प्रत्येकजण दुसर्‍या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मुंबईतील लोकलप्रमाणे धावपळ करत होता. मेट्रो येईपर्यंत दहा मिनिटांत प्लॅटफॉर्मवर जवळपास अडीचशे ते तीनशे प्रवाशांनी गर्दी केली होती. मेट्रो आल्यानंतर मेट्रोत बसण्यासाठी प्रवाशांची दरवाजावर मोठी झुंबड उडाली होती. पुणे रेल्वेस्टेशनवर दहा पंधरा प्रवाशी बसले, पुढे मंगळवार पेठ स्टेशनला एक दोन प्रवाशी चढले आणि उतरले. सिव्हिल कोर्ट येथे मात्र निम्म्यापेक्षा जास्त प्रवासी उतरले तेव्हढेच चढले. पुढे पीएमसी स्टेशनला फारसे उतरलेही नाहीत आणि चढलेही नाहीत.
सुरक्षारक्षकांची मदत…
मेट्रो स्टेशनवर तुम्हाला मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक उपस्थित आहेत. येथील सुरक्षारक्षक स्टेशनच्या सुरक्षिततेसोबतच येणार्‍या नागरिकांच्या मदतीलादेखील येतात. प्रत्येक स्टेशनवर सुरक्षारक्षक मदत करतानाचे चित्र बघण्यास मिळाले. तसेच स्टेशनवर इंग्रजीशिवाय मराठीतदेखील फलकावर सूचना लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये दिशादर्शक, प्रवासात घेण्याची काळजी, तुम्ही सोबत काय घेऊन प्रवास करू शकत नाही, याची संपूर्ण माहिती स्टेशनवर दर्शनी भागात लिहिली आहे.
मेट्रो तिकिटासाठी विविध पर्याय
प्रत्येक मेट्रो स्टेशनवर तिकिट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. रोख, क्रेडिट-डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, मेट्रो अ‍ॅप, मेट्रो कार्ड आदींद्वारे तिकिट खरेदी करता येणार आहे. तिकिट खिडकी, तिकिट वेंडिंग मशीन आणि व्हॉट्स अ‍ॅप पद्धतीने तिकिट प्राप्त केले जाऊ शकते. प्रवास सुरू करताना एन्ट्री गेटवर तिकिट टॅप केल्यावर गेट उघडून प्रवासी आपला प्रवास सुरु करु शकतात तसेच बाहेर पडतानाही तिकिट लागते. त्यामुळे तिकिट जपून ठेवावे.
या गोष्टी आढळल्या…
 कार्ड रिचार्ज करताना 1.8 टक्के चार्जेस घेतले जातात.
इतर स्थानकांवरून सिव्हील कोर्ट स्थानकात उतरल्यावर भूमिगत मार्गाने पिंपरीपर्यंत फुकट प्रवास करता येऊ शकतो. भूमिगत मार्गाच्या सुरुवातीला तिकीट तपासणी यंत्रणा असावी.
भूमिगत स्थानक मार्गात मोबाईल नेटवर्कला समस्या येत आहे.
मेट्रो कार्डचे रिचार्ज करण्यासाठी स्थानकावर यावे लागते. त्याचे रिचार्ज गुगल पे वरून करता यावे, याकरिता व्यवस्था करावी.
मेट्रो ट्रेनमध्ये असलेल्या एमर्जन्सी स्पीकरला रिस्पॉन्स मिळत नाही. ही एमर्जन्सी सेवा बंद आढळली.
पार्किंगसाठी वनाज स्थानक येथील पहिला मजला वापरता येऊ शकतो का ?
 मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा नाही, स्थानकाखाली छोटी जागा अपुरी.

Back to top button