सहा महिन्यांपासून चाकण चौक रस्ता अंधारात | पुढारी

सहा महिन्यांपासून चाकण चौक रस्ता अंधारात

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी शहरातील सर्वात मोठी रहदारी असलेल्या चाकण चौक-केळगाव चौक रस्त्यावर असलेले पथदिवे गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे स्थानिकांह भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र, नगरपालिका प्रशासनाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महावितरण विभागाला विचारणा केली असता, त्यांनी 2 दिवसांत हा विषय मार्गी लागेल, असे सांगितले.
चाकण चौक-केळगाव चौक रस्त्यावर ज्ञानेश्वर विद्यालय, रुग्णालय, धर्मशाळा आणि भक्तनिवास आहेत. तर गोपाळपुरा, चाकण रोड झोपडपट्टी, केळगाव रस्ता, घुंडरे गल्ली आदी भागात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. गेल्या 6 महिन्यांपासून या रहदारीच्या रस्त्यावरील 5 ते 6 पथदिवे बंद आहेत. इंद्रायणी नदीपलीकडे हवेली भागात पथदिवे सुस्थितीत आणि मोठ्या प्रकाशझोताचे आहेत. काही ठिकाणी पोलला एलईडी बल्ब लावून सौंदर्यात भर टाकण्यात आली आहे.

तर दुसरीकडे नदीच्या अलीकडील काही भाग अंधारात आहे. येथील अनेक पथदिवे बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधार असतो. त्याचा स्थानिकांसह भाविकांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर गैरप्रकारदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानादेखील नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

वाणिज्य भाग उजेडात, तर रहिवासी भाग अंधारात
नगरपालिकेकडून शहरात व्यावसायिक भागात वीजव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. मात्र, जो रहिवासी भाग आहे त्या भागातील वीजव्यवस्था अत्यंत बिकट आहे.

Back to top button