पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेल्या ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या बसचालकांनी शुक्रवारी (दि. 25) अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रवाशांचे हाल झाले. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 181 बस आहेत. त्यातील काही बस ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील, तर काही स्वमालकीच्या आहेत. सुमारे 4 हजार चालकांमार्फत शहरात बससेवा पुरविली जाते. 2 हजार चालक पीएमपीचे स्वत:चे, तर 2 हजार ठेकेदारांचे आहेत. यातीलच ट्रॅव्हल टाईम कंपनीकडील 200 चालकांनी शुक्रवारी अचानक संप केला. सुमारे 1700 ते 1750 गाड्या दररोज मार्गावर असायच्या. परंतु, शुक्रवारी मार्गावरील बसची संख्या काही प्रमाणात कमी झाली.