ऑस्ट्रेलिया ते जर्मनी… आव्वाज ढोल-ताशा पथकांचाच !!! | पुढारी

ऑस्ट्रेलिया ते जर्मनी... आव्वाज ढोल-ताशा पथकांचाच !!!

सुवर्णा चव्हाण

पुणे : ढोल-ताशा पथकांची संस्कृती फक्त पुण्यातच नाही, तर आता सातासमुद्रापार पोहचली असून, ऑस्ट्रेलियापासून ते जर्मनीपर्यंत सगळीकडे पथक संस्कृती रुजत आहे. विविध देशांमध्ये पूर्वी केवळ 1 ते 2 पर्यंत असणारी पथकांची संख्या आता 14 ते 15 वर पोचली आहे. विविध देशांमध्ये ढोल-ताशा पथकांची संख्या वाढत आहे. जसा पुण्यात गणेशोत्सवात पथकांच्या वादनाचा निनाद घुमतोय तसेच परदेशातही वर्षभर विविध कार्यक्रमांमध्ये पथकांचे उत्कृष्ट वादन होत आहे. या पथकांमध्ये फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर परप्रांतीयांचाही सहभाग आहे. तर स्थानिक परदेशी नागरिकही पथकांमध्ये सहभागी होत आहेत. सध्या परदेशातील या ढोल-ताशा पथकांचाही वादनाचा सराव जोमाने सुरू आहे.

ढोल-ताशा पथकांचा ही परंपरा गेल्या दहा ते बारा वर्षांपासून परदेशातही रुजत आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी, कॅनडा आदी देशांमध्ये पथकांची संख्याही वाढली आहे. काही पथके दहा वर्षे जुनी आहेत, तर काही नव्यानेच स्थापन झालेली आहेत. आपली मराठी संस्कृती, गणेशोत्सवाची परंपरा आणि तो निनाद आपल्याकडेही रुजावा, यासाठी मराठी भाषिकांनी एकत्र येऊन ढोल-ताशासह लेझीम आणि ध्वज पथकेही सुरू केली आहेत.

ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले, विविध देशांमध्ये आधी एक – दोन असलेली पथकांची संख्या आता विविध देशांमध्ये 14 ते 15 पथकांवर पोचली आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी, कॅनडासह दुबईतही ढोल-ताशा पथके स्थापन करण्यात आली आहेत. अमेरिकेत 14 ते 15 ढोल-ताशा पथके असून, दुबईमध्ये 1 पथक, जर्मनीत 7 ते 8 पथके आहेत. नोकरी आणि व्यवसायानिमित्त विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिकांनी एकत्र येऊन पथके सुरू केली आहेत. गणेशोत्सवासह वर्षभर होणार्‍या कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशा पथकांचे वादन केले जात आहे. सध्या या पथकांचाही वादनाचा सराव जोमाने सुरू असून, परदेशातही पथकांची संख्या वाढत आहे.

आम्ही सहा ते सात जणांनी एकत्र येऊन 2013 साली पथकाची स्थापना केली. पथकाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. सुरुवातीला 8 जणांचा पथकात सहभाग होता, ती संख्या आता 55 जणांवर येऊन पोचली आहे. पथकात फक्त मराठी भाषिकच नव्हे तर पंजाबी, गुजराती, बंगाली अशा भारतातील विविध भागांतील लोकही आहेत. सध्या आम्ही विकेंडला वादनाचा सराव करत आहोत. आम्ही आस्ट्रेलिया डे परेड, दिवाळी फेस्टिवल, इंडियन मेला यासह विविध कार्यक्रमांमध्ये वादन करतो. सर्वजण एकत्र येऊन वादन करतात, त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो आणि आपल्या मातीशी आपण जोडलेले आहोत, याची अनुभूती मिळते.
 – अनुप देशमुख, समन्वयक, शिवगर्जना ढोल-ताशा पथक (अ‍ॅडलेड, ऑस्ट्रेलिया)

हेही वाचा :

कचरा, राडारोडा अन् अतिक्रमणे ; मुठा कालवा रस्ता समस्यांच्या विळख्यात

पुणे : अपहरण करून डॉक्टरला लुटणारी टोळी जेरबंद

Back to top button