विमासंरक्षित रकमेच्या 25 टक्के मर्यादेत नुकसानभरपाई | पुढारी

विमासंरक्षित रकमेच्या 25 टक्के मर्यादेत नुकसानभरपाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पाऊसमानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शिरूर तालुक्यातील 4 मंडळ गट, मंडळामध्ये व बारामती तालुक्यातील 3 मंडळ गटांमध्ये पीक पेरणी, लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करण्यात आल्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केली आहे. शिरूर तालुक्यात मूग पिकासाठी एकूण 10 तसेच बारामती तालुक्यात बाजरी पिकासाठी एकूण 11 अधिसूचित मंडळ, मंडळ गट अधिसूचित करण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय समितीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार बारामती व शिरूर तालुक्यातील काही मंडळ गट व मंडळांमध्ये अनुक्रमे बाजरी व मूग या पिकांचे नजर अंदाज सर्वेक्षणाअंती अधिसूचित क्षेत्रामध्ये 75 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी झाली नसल्याबाबत अहवाल प्राप्त आहेत.  मुगाकरिता विमा संरक्षित रक्कम रुपये 20 हजार रुपये प्रतिहेक्टर व बाजरीकरिता विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार रुपये प्रतिहेक्टर असून, विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्केपर्यंत मर्यादेत नुकसानभरपाई निश्चित करण्यात येत आहे.

Back to top button