पुणे : कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या फलकावर पुन्हा पटेलांचे नाव! | पुढारी

पुणे : कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या फलकावर पुन्हा पटेलांचे नाव!

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल सामान्य रुग्णालयाचे नामकरण आणि नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रवेशद्वारावरचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव हटविण्यात आले होते. त्याविषयी
दै. ‘पुढारी’ने सोमवारी (दि. 21) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर कॅन्टोन्मेंट प्रशासनाने वृत्ताची दखल घेतली असून, पुन्हा पटेल यांचे नाव प्रवेशद्वारावरील फलकावर झळकले.

पुणे कॅन्टोन्मेंट आणि लगतच्या भागातील नागरिकांसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय वरदान ठरत असून, सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोमवारी त्याचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचेही नूतनीकरण झाले होते. मात्र, त्यावर पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय असे नाव होते; परंतु नूतनीकरणात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड सामान्य रुग्णालय, असे ठळक अक्षरात नाव लिहण्यात आले होते. त्याबाबत दै. ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव लिहिण्यात आले आहे.

बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल म्हणाले, पटेल यांचे नाव छोट्या अक्षरात टाकावे लागत होते. त्यामुळे संरक्षण भिंतीवर मोठ्या अक्षरात नाव टाकण्यात आले. मात्र, वल्लभभाई पटेल यांचे नाव पुन्हा प्रवेशद्वारावर टाकावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. त्यानुसार नाव टाकण्यात आले आहे.

Back to top button