‘पीमपी’त बसा आणि सुपरफास्ट फिरा | पुढारी

'पीमपी'त बसा आणि सुपरफास्ट फिरा

पुणे : पीएमपी प्रशासनाकडून आता एसटीप्रमाणेच विनावाहक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता पीएमपी अध्यक्षांनी मार्गांची पाहणी करण्याचे आदेश दिले असून, प्रशासनाकडून 50 मार्गांची पाहणी करण्यात येणार आहे. या सेवेमुळे पुणेकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 181 बस आहेत. त्याद्वारे शहरातील आणि पीएमआरडीए हद्दीतील 359 मार्गांवर बससेवा पुरविली जाते. दिवसाला 10 ते 12 लाख प्रवासी पीएमपीच्या या सेवेद्वारे प्रवास करतात. मात्र, शहराची लोखसंख्या 50 लाखांपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत पीएमपीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या कमी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पीएमपीच्या गाड्यांची वारंवारिता आणि बससाठी पाहावी लागणारी वाट.

तसेच, बसगाड्यांमधील गर्दी ही कारणे पीएमपीची सेवा न वापरण्याची कारणे आहेत. या कारणांमुळे पुणेकर नागरिक दुचाकी खरेदी करण्यावर भर देत आहेत. वेळेत जर बस मिळाली तर पुणेकर नागरिक नक्कीच बसचा वापर करतील आणि ते बससेवेकडे ओढले जातील, असा विश्वास पीएमपी प्रशासनाचा आहे. त्यामुळे पीएमपी अध्यक्षांच्या संकल्पनेनुसार आता ताफ्यातील बस मार्गांवर विनावाहक सेवा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नुकतीच मनपा ते भोसरी या एका मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, डिझेलवर चालणार्‍या सर्व बस आता सीएनजीवर करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच पीएमपीच्या बस डिझेलमुक्त होणार असल्याने शहरातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे.

प्रवाशांना वेगवान सेवा पुरवण्यासाठी आम्ही विनावाहक बससेवेत वाढ करण्याचे नियोजन केले आहे. काही मार्गांवर पाहणी करण्यात येत असून, लवकरच ही सेवा सुरू होईल.
                     – सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Back to top button