पुणे : विमाननगर भागातील गुंड टोळीवर मोक्का | पुढारी

पुणे : विमाननगर भागातील गुंड टोळीवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विमाननगर भागात दहशत माजविणार्‍या गुंड टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील 52 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. प्रसाद ऊर्फ चिक्या संपत गायकवाड (वय 25, रा. महादेवनगर, वडगाव शेरी), अरबाज अयुब पटेल (वय 24, रा. नागपूर चाळ, येरवडा), बबलू संतोष चव्हाण (वय 22 ,रा. संजय पार्क, विमाननगर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

विमाननगर भागात एका विक्रेत्याला धमकावून आरोपी गायकवाड, पटेल, चव्हाण यांनी लुटले होते. गायकवाड, पटेल सराईत आहेत. त्यांच्याविरुद्ध दरोडा, तोडफोड, दहशत माजविणे, शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे निरीक्षक संगीता माळी यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गायकवाड आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

Back to top button