आशा वर्कर्सना लाखोंचा गंडा ;  दुचाकीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक

आशा वर्कर्सना लाखोंचा गंडा ; दुचाकीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : स्वस्तात स्कूटी दुचाकी देण्याच्या आमिषाने वेल्हे, हवेली, इंदापूरसह जिल्ह्यातील आशा वर्कर्सची (सेविका) लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. लाखो रुपये घेऊन कथित आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनचा नेता श्रीमंत बाबूराव घोडके हा फरार झाला आहे. खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून बारामतीसह जिल्ह्यातील आशा वर्कर्सला मोफत दुचाकी देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. असे असताना दुसरीकडे दुचाकीच्या आमिषाने आशा वर्कर्सची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकाराने प्रशासन हादरले आहे.

वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा भागांतील आशा वर्कर्सनी चार महिन्यांपूर्वीच याबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आला होता. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असे आशा वर्कर्सचे म्हणणे आहे तर तक्रारदार आशा वर्कर्सनी जबाब दिला नसल्याने प्रत्यक्ष कथित युनियन नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे वेल्हे पोलिसांनी सांगितले. फसवणूक झालेल्या आशा वर्कर्सची सर्वांत अधिक संख्या इंदापूर तालुक्यात आहे. इंदापूरमधील 48 आशा वर्कर्सकडून स्कूटीसाठी प्रत्येकी 26 हजार 500 रुपये घेतले. वेल्हे तालुक्यातील 25 जणींकडून प्रत्येकी 16 हजार 500 रुपये घेतले. खडकवासला भागातील 15 जणींनी प्रत्येकी 26 हजार 500 रुपये घेतले. स्वस्तात स्कूटी देण्याच्या आमिषाने श्रीमंत घोडके याने जिल्ह्यातील शेकडो आशा वर्कर्सकडून एक ते दोन कोटी रुपये घेतले असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. दरम्यान, वेल्हे पोलिस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करूनही अद्यापही पोलिसांनी कारवाई केली नसल्याने आंत्रोली (ता. वेल्हे) येथील आशा वर्कर सपना राऊत यांनी सांगितले.

संतप्त आशा वर्कर्सचा घोडकेला रात्रभर घेराव
वारजे-कर्वेनगर येथे श्रीमंत घोडके याचे कार्यालय आहे. तेथे त्याची आधार नावाची पतसंस्था आहे. तेथे मंगळवारी (दि. 22) रात्री 10 पासून पहाटे 5 पर्यंत फसवणूक झालेल्या 50 पेक्षा अधिक संतप्त आशा वर्कर्सनी पैसे परत मिळण्यासाठी घोडके याला घेराव घातला. कार्यालयातून पहाटे पाणी पिण्यासाठी घोडके बाहेर पडला आणि तेथून तो पसार झाला.

दुचाकी देण्याच्या आमिषाने श्रीमंत घोडके याने आशा वर्कर्सकडून गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये प्रत्येकी 26 हजार 500 रुपये घेतले. दिवाळीच्या सणात सर्व आशा वर्कर्सला स्कूटी देणार असे सांगितले. मात्र, वर्षभर पाठपुरावा करूनही स्कूटी मिळाली नाही.
                                                                         – शुभांगी वैद्य, आशा वर्कर, नर्‍हे

आशा सेविकांनी याप्रकरणी तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित व्यक्ती पैसे देतो, कारवाई करू नका, असे म्हणत असल्याचे आशा सेविकांनी सांगितले. त्यांनी जबाब दिला नाही. जबाब नोंदवल्यावर तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल.
                                     – रणजित पठारे, सहायक पोलिस निरीक्षक, वेल्हे.

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर्सला कंपन्याच्या सीएसआर निधीतून मोफत दुचाकी वाहन देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आशा वर्कर्सची फसवणूक करणारा शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल. आशा वर्कर्स आमिषाला बळी पडल्या या प्रकाराची चौकशी केली जाईल. अशी फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात येतील.
                                                      – डॉ. राम हुंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

logo
Pudhari News
pudhari.news