आ. अतुल बेनके कृषिमंत्र्यांसोबत ; दिल्लीत भूमिकेवरून शेतकर्‍यांमध्ये चर्चा सुरू | पुढारी

आ. अतुल बेनके कृषिमंत्र्यांसोबत ; दिल्लीत भूमिकेवरून शेतकर्‍यांमध्ये चर्चा सुरू

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा :  कांदा निर्यात शुल्कवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार यांचा गट रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना आपण तटस्थ आहोत, असे सांगणारे जुन्नरचे आमदार अतुल बेनके सरकारमध्ये सहभागी असलेल्या गटाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह दिल्लीला गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा तटस्थ असलेले बेनके अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. बेनके यांनी मुंडे यांच्यसह वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांपासून आतापर्यंत तटस्थ असलेले आमदार अतुल बेनके कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत गेल्याने नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्या वेळी अतुल बेनेके यांनी तटस्थतेची भूमिका घेतली होती. आता मात्र हळूहळू अजित पवार गटाच्या दिशेने ते चालल्याचे दिसत आहेत. मंगळवारी कांदा प्रश्नावरून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आळेफाटा येथे आंदोलन केले. या आंदोलनाला आमदार अतुल बेनके अनुपस्थित होते. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. धनंजय मुंडेंसोबत या बैठकीला आमदार अतुल बेनके उपस्थित असल्याने ते अजित पवार गटात जाणार, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

मी शेतकर्‍यांसाठी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. काही विरोधी मंडळी चुकीची चर्चा पेरतात. मी माझी राजकीय भूमिका जाहीर केली आहे. मी अद्यापही तटस्थ आहे.
                                                                         अतुल बेनके, आमदार,जुन्नर

Back to top button