

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत येणारा बोर्ड कार्यालय ते किन्हई या दोन ते अडीच किलोमीटरच्या रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे. काही ठिकाणी किमान पंचवीस ते तीस मीटर अंतरापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साठल्याने खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज चालकांना येत नसल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्त्याची झाली चाळण या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. या गावातील ग्रामस्थ वेळेवर घरपट्टी, नळपट्टी वेळेवर जमा करतात.
तरीही देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड किन्हई गावच्या नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. अगदी पहाटे उठून कामाला जाणारे कामगार, शालेय विद्यार्थी, गावात येणारे पाहुणे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड या नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यावर बोर्ड आणि संरक्षण विभाग जागे होणार आहे का? असा प्रश्न किन्हई गावचे नागरिक करू लागले आहेत.
नागरिकांना केवळ मिळतात आश्वासन
माताड मुरूम टाकण्यापेक्षा खडकाळ मुरूम टाकून त्यावर डांबरीकरण केले, तर किन्हई गावच्या नागरिकांना प्रवास करणे सुकर होईल. पावसाळा संपल्यावर या रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण केले तरी काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. कितीतरी वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर अद्याप रस्त्याचे काम बोर्डाकडून करण्यात आले नाही. हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत ग्रामस्थांनी आमदार, खासदार यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. परंतु, आजपर्यंत त्यांच्याकडून फक्त आश्वासने मिळाली. काही दिवसांपूर्वी बोर्डाचे मुख्याधिकारी अमितकुमार माने यांच्याशी नागरिकांनी चर्चा केली होती; पण या चर्चेतील मागणीला मुख्याधिकारी, प्रशासक यांनी कचर्याची टोपली दाखविली आहे.
सध्या पाऊस सुरू आहे. तात्पुरता मुरूम टाकला तर पुन्हा गाळ होणार आहे. पाऊस थांबल्यानंतर एक दीड महिन्यानंतर या रस्त्याचे काम केले जाईल. एक-दोन दिवसांत बोर्डाचे मुख्याधिकारी यांना घेऊन या रस्त्याची पाहणी केली जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
– अड. कैलास पानसरे, प्रशासक, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड