पुणे : कचरा प्रक्रियेसाठी 17 अधिकृत संस्था ; इतर संस्थांना काम दिल्यास महापालिकेची कारवाई

पुणे : कचरा प्रक्रियेसाठी 17 अधिकृत संस्था ; इतर संस्थांना काम दिल्यास महापालिकेची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेने 17 संस्थांना मान्यता दिली आहे. मोठ्या सोसायट्यांनी अधिकृत संस्थांनाच कचरा प्रक्रियेचे काम द्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच, अन्य संस्थांना कचरा प्रक्रियेचे काम दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. शहरातील मोठ्या सोसायट्यांनी आपल्याच परिसरात ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. असे प्रकल्प असणार्‍या सोसायट्यांना पालिकेकडून मिळकत करात 5 टक्के सूट मिळते. मात्र, अनेक सोसायट्या करात सूट घेऊनही कचरा प्रकल्प कार्यान्वीत करीत नाहीत. त्या ऐवजी या सोसायट्या हे काम त्रयस्थ संस्थेला देतात. अनेक सोसायट्या व संस्थांनी त्यासाठी ठेकेदार नेमले आहेत.

परंतु, यातील अनेक ठेकेदार मान्यताप्राप्त नाहीत. त्यापैकी काही सोसायट्यांमधून कचरा संकलित करून प्रक्रिया न करताच शहराच्या अन्य भागांत नेऊन टाकतात. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागावर अतिरिक्त बोजा पडतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या 17 संस्थांना मान्यता दिली आहे. त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित सोसायट्या व संस्थांनी या मान्यताप्राप्त संस्थांकडे कचरा देणे बंधनकारक आहे. याशिवाय, अन्य संस्था कचरा संकलन व प्रक्रिया करत असतील, तर त्यांनी महापालिकेकडून मान्यता घ्यावी, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

दररोज शंभर किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण करणार्‍या गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्याकडील कचराप्रक्रिया करणार्‍या अधिकृत संस्थांकडेच देणे बंधनकारक आहे, असेही अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले. महापालिकेने कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करणार्‍या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांनी या 17 संस्थांची कचरा संकलन प्रक्रिया, मनुष्यबळ, कचरा प्रक्रिया प्रकल्प व यंत्रणेचा पाहणी केल्यानंतरच त्यांना मान्यता दिली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता असून, त्यांच्याकडून किमान पाच टन कचर्‍याचे संकलन व प्रक्रिया केली जाते, असेही डॉ. खेमनार यांनी नमूद केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news