महत्त्वाची बातमी ! तलाठी पदाच्या परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी | पुढारी

महत्त्वाची बातमी ! तलाठी पदाच्या परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातून विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ही परीक्षा घेताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ होत आहे. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना परीक्षेसाठी जाताना कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर जाताना करण्यात येणार्‍या तपासणीत अशा वस्तू सापडल्यास तातडीने संबंधित उमेदवारांवर एफआयआर नोंदविण्याची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा भूमी अभिलेख विभागाने दिला आहे.
तलाठी पदाच्या 4 हजार 466 जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातून दहा लाख 40 हजार 713 एवढे अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत.

ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. आतापर्यंत 17, 18, 19, 20, 21 आणि मंगळवारी 22 ऑगस्ट असे सहा दिवस तीन सत्रांत राज्यभरात परीक्षा घेण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यात काही ठिकाणी पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोमवारी (21 ऑगस्ट) तांत्रिक कारणांमुळे परीक्षा दोन तास विलंबाने सुरू झाली. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून काटेकोर नियोजन करत उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी केली आहे.

याबाबत माहिती देताना अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते म्हणाले, राज्यभरातील विविध केंद्रांवर तीन सत्रांत परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी केली आहे. याबाबत उमेदवारांना यापूर्वीच कळविण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार होऊ नयेत, याकरिता परीक्षा केंद्रांवर तपासणीदेखील करण्यात येत आहे. या तपासणीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू निदर्शनास आल्यास संबंधितांवर थेट एफआयआर नोंदविण्याची कारवाई केली जाणार आहे.’

दरम्यान, ऑनलाइन परीक्षा नको असणार्‍या घटकांकडून उमेदवारांमध्ये संभ—म निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, टीसीएस कंपनीचा अधिकारी यांची समिती केली आहे. अनुचित घटना घडल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही रायते यांनी सांगितले.

हेही वाचा :

दाभोलकरांसह कुटुंबीयांकडून जिवाला धोका असल्याबाबत तक्रार नव्हती

स्वराज्याची पहिली राजधानी राजगड जूनपासून अंधारात ; वीजबिल मात्र दर महिन्याला

Back to top button