पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली | पुढारी

पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली

शंकर कवडे

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात फळभाज्यांची आवक वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत परराज्यांसह जिल्ह्यातून आवक दहा ट्रकने वाढून 110 ट्रकपर्यंत पोहचली.
बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, कारल्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. टोमॅटोच्या नवीन लागवडीचे उत्पादन सुरू झाल्याने पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. परिणामी, घाऊक बाजारात किलोचे दर 20 ते 30 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. याखेरीज कांद्याच्या निर्यात शुल्कातही 40 टक्क्यांनी वाढ केल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचे मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले.

परराज्यांतून झालेल्या आवकेत कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 12 टेम्पो; कर्नाटक, गुजरात येथून कोबी सुमारे 4 टेम्पो; आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 4 टेम्पो शेवगा; इंदूर येथून 10 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 4 टेम्पो, गुजरात येथून भुईमुगाच्या शेंगा सुमारे 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण 10 टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 700 गोणी, गवार 5 टेम्पो, भेंडी 8 टेम्पो, कोबी 5 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, टोमॅटो सुमारे 11 हजार क्रेट, तांबडा भोपळा, सिमला मिरची आणि काकडी प्रत्येकी 10 टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे 100 गोणी, पुरंदर, वाई सातारा येथून मटार 8 टेम्पो, कांदा सुमारे 80 ट्रक, इंदूर, आग्रा भागातून बटाटा 45 ट्रक आवक झाली होती.

पालेभाज्यांतील स्वस्ताई टिकून
पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत पालेभाज्यांच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी, बाजारात पालेभाज्यांची वाढलेली आवक कायम आहे. रविवारी बाजारात कोथिंबिरीची दीड लाख, तर मेथीची सत्तर हजार जुड आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीसह मेथीची आवक स्थिर राहिली. बाजारातील आवक-जावक कायम राहिल्याने पालेभाज्यांचे गत आठवड्यातील दर टिकून होते.

हेही वाचा :

नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक, वणीत रास्तारोको

बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी

Back to top button