धक्कादायक ! शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवले | पुढारी

धक्कादायक ! शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गाव असलेल्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर चक्क जमिनीवरील सतरंजीवर झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंदाजे 60 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना जमिनीवर सतरंजीवर झोपवण्यात आले. याबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले की, सरकार म्हणते, शासन आमच्या दारी; मात्र या आरोग्य केंद्रात साध्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना योग्य सुविधा मिळत नसतील तर सोबत आलेल्या नातेवाइकांचे तर मोठे हाल होत आहेत.

लहान मूल असल्याने त्यांना साधे पाणीदेखील प्यायला नसल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात आला. माझी जाऊ सारिका मिलिंद खळे यांना शस्त्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर येथे दाखल केले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये सतरंजीवर झोपवण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत चहा-नाष्टा दिला गेला नाही. तिच्याबरोबरच्या काही महिलांची शस्त्रक्रियाही केली नाही. याबाबत आम्हाला माहिती दिली गेली नाही. याबाबतची तक्रार मी निरगुडसर आरोग्य केंद्राच्या तक्रारपुस्तकात लिहिलेली आहे, असे देवगावच्या नीलिमा संदीप खळे यांनी सांगितले.

आरोग्य अधिकार्‍यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण
शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना भूल असल्याने बेडवर झोपविणे धोक्याचे वाटल्याने त्यांना बेडऐवजी खाली सतरंजीवर झोपवले, असे हास्यास्पद स्पष्टीकरण निरगुडसर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा मोरमारे यांनी दिले. सर्वांना बेड उपलब्ध नसल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. पिण्याच्या पाण्याची आणि रुग्णांची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. यापुढेही रुग्णांची आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असेही सांगण्यास त्या विसरल्या नाहीत.

माजी उपसरपंचांकडून समर्थन
निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचे समर्थन केले आहे. ते म्हणतात की, या आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास 26 गावे येतात. येथे नेहमीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. आतापर्यंत कोणाचीही तक्रार आलेली नाही. रुग्णालयात सीसीटीव्ही बसवलेले आहेत. पुरुषांनी या कक्षात घुसून व्हिडीओ काढणे अतिशय निंदनीय आहे.

हेही वाचा :

केसरी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात 

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले

 

Back to top button