खा. सुळे यांच्या दौर्‍यात रमेश थोरात गट गैरहजर | पुढारी

खा. सुळे यांच्या दौर्‍यात रमेश थोरात गट गैरहजर

खोर : पुढारी वृत्तसेवा :  खासदार सुप्रिया सुळे दौंड तालुक्याच्या दौर्‍यावर येतात त्या वेळी नेहमीच आघाडीवर असणारा माजी आमदार रमेश थोरात यांचा गट शुक्रवारी मात्र सुळे यांच्या दौर्‍यापासून दूरच राहिला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दौंड तालुक्यातदेखील उभी फूट पडली आहे. खा. सुप्रिया सुळे यांच्या दौर्‍यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांचा गट हजर राहिला नाही. रमेश थोरात हे अजित पवार गटात गेले असल्याने शुक्रवारच्या दौर्‍याला फक्त राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांचा गट फक्त या वेळी उपस्थित होता.

त्यामुळे या दौर्‍यात खर्‍या अर्थाने दौंड तालुक्याला दोन गटाची विभागणी प्रत्यक्षात पाहावयास मिळाली. आम्ही राष्ट्रवादीस पक्षाच्या भूमिकेत बदल केलेला नसून, आम्ही आहे त्या ठिकाणीच आहे. आमचा संयम व लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कधी ही पातळी सोडून वागत नसल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी या वेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच दौंड तालुक्याचा दौरा केला.

दौंड तालुक्याच्या लोणारवाडी, शिंगाडेवाडी, बोरीबेल, काळेवाडी, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर, पेडगाव, वडगाव दरेकर, राजेगाव, आलेगाव या भागांचा दौरा करून या भागातील अडचणी समजून घेत अनेक प्रश्नाला उत्तरे मिळवून देण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी बोरीबेल या गावाला भेट दिली. ग्रामपंचायत सदस्य सुनंदा खोमणे यांनी बोरीबेल ग्रामस्थांच्या वतीने बोरीबेल रेल्वे स्थानक परिसरातील गावांसाठी सोयीचे आहे. परंतु पुणे-सोलापूर पॅसेंजर येथे थांबत नसल्याने गैरसोय होत आहे. या गाडीला या ठिकाणी थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली. खा. सुळे यांनी त्याची लागलीच दखल घेत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना ’टॅग’ करत ’टि्वट’ केले आहे.

दरम्यान, खा. सुळे म्हणाल्या, दौंड तालुक्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठा गहन झाला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, बादशहा शेख, प्रकाश नवले, सचिन काळभोर, अजित शितोळे, ग्रामस्थ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Himachal Rain Alert : हिमाचलमध्ये परिस्थिती नियंत्रणात; मात्र पुढचे २ दिवस अति मुसळधारेचा इशारा

Pune : एनडीए चौक ओलांडण्यासाठी उभारणार पूल

Back to top button