कर्नलच्या ताब्यातील पिस्तुलासह 20 जिवंत काडतुसांची चोरी | पुढारी

कर्नलच्या ताब्यातील पिस्तुलासह 20 जिवंत काडतुसांची चोरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नगरमधील आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये कर्नल पदावर असलेल्या एकाचे खासगी वापरातील पिस्तूल आणि जिंवत काडतुसे चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 21 मार्च ते 12 ऑगस्ट दरम्यान खडकीतील आर्मी बेस वर्कशॉपमध्ये घडली.
याप्रकरणी समीर गर्ग यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हे नगरमधील आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये कर्नल पदावर कार्यरत आहेत. 2021 मध्ये गर्ग यांची पुण्यातील खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी येथून अहमदनगर येथे बदली झाली. पुण्यात असताना त्यांना खडकी येथे एक खोली मिळाली होती. ती खोली त्यांच्या ताब्यातच आहे. त्या खोलीत त्यांचे सर्व साहित्य ठेवलेले असते.

21 मार्च 2023 रोजी गर्ग यांनी पुण्यात येऊन खडकीतील खोलीमध्ये येऊन साहित्याची खात्री केली होती. त्या वेळी सर्व साहित्य जागेवर होते. मात्र, 12 ऑगस्ट रोजी ते पुन्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या आर्मी बेस वर्क शॉपमधील खोलीमध्ये जाऊन पाहणी केली, त्या वेळी त्यांना त्यांच्या खोलीची खिडकी तुटलेल्या अवस्थेत दिसली. त्यांना पिस्तूल आणि 20 जिवंत काडतुसे दिसली नाहीत. त्यानंतर त्यांनी याबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम हे पुढील तपास करीत आहेत.

 

Back to top button