Pune Pmc News : पुणे महापालिकेला निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रध्वजांचा पुरवठा | पुढारी

Pune Pmc News : पुणे महापालिकेला निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रध्वजांचा पुरवठा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासाठी महापालिकेला या वर्षी पुन्हा निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रध्वजांचा पुरवठा झाला आहे. अशा निकृष्ट दर्जाच्या ध्वजांचे वाटप पालिकेकडून होत असून, त्यांचे वितरण करण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे. गतवर्षी स्वातंत्र्य दिनाला हे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले होते. त्यासाठी नागरिकांना देण्यासाठी महापालिकेने खरेदी केलेल्या तिरंगा राष्ट्रध्वजात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे ध्वज आले होते.

पालिकेने ते ठेकेदाराला परत केले होते. मात्र, या वर्षी पुन्हा अशाच पध्दतीचे निकृष्ट ध्वज ठेकेदाराने पालिकेला दिले असल्याचा आरोप काँग्रेसचे सचिन बहिरट आणि बाबा सय्यद यांनी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने दर्जाहीन हलक्या प्रतीचे पातळ कापड, निरनिराळा ध्वजांचा आकार, तीनही रंगांचे आकारमान एकसारखे नसणे, ध्वज काठीत घालण्यासाठीची उलटसुलट शिलाई, अशोकचक्र मध्यभागी नसणे, सुमार दर्जाचे कापड, त्यावर रंगीत डाग, अशा प्रकारचे ध्वज वाटप करण्यात येत आहेत.

जे राष्ट्रध्वज वितरित होत आहेत, त्यामध्ये अनेक ध्वजांचा दर्जा निकृष्ट असल्याने शहराच्या विविध भागांतील नागरिकांकडून तीव्र नापसंती व्यक्त करीत रोषही व्यक्त करण्यात येत आहे. अशा निकृष्ट ध्वजामुळे आपल्याकडून राष्ट्रद्रोह होऊ नये, यासाठी अशा प्रकारच्या राष्ट्रध्वजांचे वितरण महापालिकेने करू नये. तसेच ध्वजसंहितेनुसार प्रमाणित नसलेला राष्ट्रध्वज आपल्या घरावर फडकवू नये, असे आवाहन बहिरट आणि सय्यद यांनी केले आहे.

पाच लाख ध्वज वाटण्याचे नियोजन

महापालिकेकडून पाच लाख राष्ट्रध्वज वाटण्याचे नियोजन आहे. त्यामधील 2 लाख पालिका खरेदी करणार असून, 3 लाख राज्य शासनाकडून मिळणार आहेत. मात्र, पालिकेला आत्तापर्यंत जेमतेम 60 ते 70 हजारच ध्वज मिळाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित ध्वज कधी मिळणार आणि त्याचे वाटप तरी कधी होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा

राज्यातील निरक्षरांचे गुरुवारपासून सर्वेक्षण

मेट्रो प्रवासासाठी मोठी गर्दी; विकेंडला हजारो पुणेकरांनी घेतला आनंद

जयसिंगपुरातून ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण

Back to top button