पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळा समुपदेशकविनाच | पुढारी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळा समुपदेशकविनाच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर असलेला ताणतणाव कमी करण्यासाठी लवकरच सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर समुपदेशक नेमण्यात येणार असा निर्णय एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आला होता. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने लोटूनही अद्याप शाळांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे चाळी, झोपडपट्टीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचे वातावरण, घरातील समस्या याचा कळत-नकळत परिणाम, ताण त्यांच्या मानसिकतेवर येत असतो. त्यामुळे एखादा विद्यार्थी असा का वागतो किंवा त्याला कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणे आवश्यक असते.

32 समुपदेशकांची होणार नेमणूक
शिक्षण विभागाकडून 32 मानसोपचार समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळामध्ये 40 हजार तर 18 माध्यमिक विद्यालयात 8 हजारांवर विद्यार्थिसंख्या आहे. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असतात. या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या घरच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत त्यांना मानसशास्त्रीय समुपदेशनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरुवातीला महापालिकेच्या 105 शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सीएसआर किंवा एखाद्या संस्थेच्या माध्यमातून आउट सोर्सिंग करण्यात येणार आहे.

सध्या आकांक्षा फाउंडेशनच्या ताब्यात असलेल्या 5 शाळांमध्ये 5 समुपदेशक आहेत. तर माध्यमिक शाळांमध्ये 8 समुपदेशक कार्यरत आहे. आता नव्याने ज्या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या हजारावर आहे. अशा शाळांमध्ये 3 ते 5 समुपदेशकांची नेमणूक करणार आहे. पण विद्यार्थिसंख्या पाहता आणखी समुपदेशकांची गरज भासणार आहे.

महापालिकेच्या शाळामध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. लवकरच शाळांमध्ये समुपदेशक नेमण्यात येतील.
                                   -विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग

Back to top button