राज्यस्तरावर स्थापन करणार राज्य वातावरणीय कृती कक्ष | पुढारी

राज्यस्तरावर स्थापन करणार राज्य वातावरणीय कृती कक्ष

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वातावरणीय अनुकूल कृती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर आता ‘राज्य वातावरणीय कृती कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने घेतला आहे. जिल्हा वातावरणीय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर देखरेख, राज्यातील वातावरणीय बदलाशी संबंधित माहितीचे संकलन करून उपाययोजना सुचवणे, राज्यात हरित उपक्रम राबवण्यासाठी समन्वय संस्था म्हणून काम करणे अशी या कक्षाची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला. राज्य वातावरण कृती आराखडा 2014 मध्ये तयार करण्यात आला. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल विभागाच्या सूचनांनुसार राज्य वातावरण कृती आराखडा सुधारित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्याची, वातावरणीय बदल अनुकूल धोरणांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करणे आवश्यक आहे. मात्र, वातावरणीय बदल अनुकूल धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विभागात स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नसल्याने ’राज्य वातावरणीय कृती कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कक्षाच्या संचालकपदी जिल्हाधिकारी किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येईल. तर वातावरणीय वित्त तज्ज्ञ, वातावरणीय शमन तज्ज्ञ, वातावरणीय अनुकूलन तज्ज्ञ, प्रकल्प सल्लागार ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील, असे नमूद करण्यात आले आहे. राज्य वातावरणीय कृती कक्षाची कार्यकक्षाही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार वातावरणीय बदलाच्या कृतीमध्ये येणार्‍या प्रतिबंध, अनुकूलन आणि शमन या तीन घटकांवर लक्ष केंद्रित करणे, जिल्हा वातावरणीय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर देखरेख, राज्यातील वातावरणीय बदलाशी संबंधित माहितीचे संकलन करून उपाययोजना सुचवणे, राज्यात हरित उपक्रम राबवण्यासाठी समन्वय संस्था म्हणून काम करणे, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, विविध भागधारकांशी समन्वय साधणे अशी कामे कक्षाला करावी लागतील.

हेही वाचा

बाणेर : चांदणी चौकाचे स्टार उजळले, सेवा रस्त्याचे कधी? नागरिकांचा सवाल

‘हर घर तिरंगा’ अंतर्गत टपाल विभागातर्फे रॅलीतून जागृती

मंचर : उसाचे पीक जळू लागले; शेतकरी चिंताग्रस्त

Back to top button