पुणे; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौक हे नाव कसे पडले, पुणेकरांच्या सवयी, इथल्या पाट्या, मंदिरांची मजेशीर नावे अन नागपूर-पुणे शहरातील विकासाची स्पर्धा… यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय टोलेबाजी रंगल्याचे पुण्यातील कार्यक्रमात पाहायला मिळाले. सकाळी अकराची वेळ. चांदणी चौकाचा भव्य उड्डाणपूल नववधूप्रमाणे नटलेला, सजलेला होता. या कार्यक्रमास निमंत्रितांसह पुणेकरांची मोठी गर्दी झाली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणास उभे राहिले. ते म्हणाले, चांदणी चौकात एका दगडावर चांदणी कोरलेली होती म्हणून या चौकाला चांदणी चौक असे नाव पडले. आपण दगडावर बदाम, बाण अजून काहीही कोरतो. कुणा कुणाची नावे कोरलेली असतात. आम्ही पुणेकर कोणालाच सोडत नाही. अगदी देवालाही नाही. खुन्या मुरलीधर, जिलब्या मारुती, निवडुंग्या विठोबा अशी देवळांची नावे पुणेकरांनी कशी ठेवली ते सांगताच हशा पिकला. मेट्रो पुण्याची आधी मंजूर झाली; पण काम आधी नागपूरचे झाले, असा टोला त्यांनी लगावला.
यानंतर फडणवीस भाषणाला उभे राहिले. ते म्हणाले, मला वाटलं की, या चौकात वाहतूक कोंडीने दिवसाही तारे दिसतात म्हणून लोकांनी या चौकाला चादंणी चौक नाव दिले. त्यावर खसखस पिकली. व्यासपीठावर बसलेले अजित पवार त्यावर म्हणाले, 'अहो, गुगलवरही चांदणी चौक असे नाव टाईप करताच पुण्याचा चांदणी चौक दिसतो, दिल्लीचा नाही बरं…' यावर फडणवीस म्हणाले, 'तुम्ही पुणेकर हुशार. गुगलही तुमच्याच हातात आहे. मात्र इथले निर्णय घेताना आमची दमछाक होते. कारण पुणेकर अमेरिका, युरोप आणि अजून कुठले कुठले रिपोर्ट दाखवतात. त्यामुळे नागपूरची मेट्रो आधी झाली.'
गडकरी यांच्या भाषणाची वेळ आली. त्यांनी मास्टर स्ट्रोक हाणले. ते म्हणाले, चांदणी चौकाच्या जागेवरून मला या शहरात अनेक चकरा माराव्या लागल्या. एनडीएनेही 17 कोटी मागितले. आपला रस्ताही चांगला करुन घेतला. घैसास गुरुजी तर सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांच्याशी माझे बोलणे झाले. त्या जागेचे पैसे आम्ही देणार आहोत. या रस्त्याचे डिझाईन इतके किचकट होते की, ते मला आयआयटीकडे द्यावे लागले. आता पुणे शहर वाढवू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या शहरात हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण कमी झाले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे मी आता व्हीआयपी गाड्यांचे सायरनच बदलणार आहे. त्यातून शंखनाद, बासरीचे सुमधूर आवाज ऐकू येतील. या चौकाचे नाव आता दोन्ही दादांनी मिळून नक्की ठरवा, एनडीए चौक की चांदणी चौक.
अजित पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या चौकात वाहतूक कोंडीत एकदा अडकले होते. नंतर इथल्या कामाला वेग आला. आज तेच नाहीत, त्यावरून पत्रकार लिहितील की, हे रुसले, ते रुसले. वास्तवात असे काहीही झालेले नाही. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे येथे आलेले नाहीत. काही लोक म्हणतात, अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस या दोघांचा डोळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आहे. मात्र एक लक्षात घ्या, त्या खुर्चीवर आधीच एक व्यक्ती बसलेली असताना एकाच खुर्चीवर दोघेही डोळा ठेवण्याइतके आम्ही वेडे नाही.
हेही वाचा