पुणे : राज्यात खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमधील अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रत्यारोपणतज्ज्ञांचा अभाव, जनजागृतीमधील कमतरता आणि इच्छाशक्तीची उणीव, अशा कारणांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये अवयवदानाची चळवळ शिथिल झाली आहे. राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेकडून (सोट्टो) मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै 2023 या कालावधीत खासगी रुग्णालयांमध्ये 72 दात्यांचे, तर शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ 2 दात्यांचे अवयवदान झाले. एकूण 74 दात्यांकडून मिळालेले 220 अवयव रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यापैकी 215 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांमध्ये, तर 5 शासकीय रुग्णालयांमध्ये पार पडल्या.