

कुरकुंभ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीतील वाढत्या अपघातामुळे हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांना या परिसरात आपला जीव गमवावा आहे. मागील 20 दिवसांत दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात वाढत असले, तरी अजूनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या पाटस टोल प्रशासनाला जाग येईना, अशी अवस्था आहे. पुणे ते सोलापूर हा 260 किलोमीटर लांबीचा भलामोठा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे.
महामार्गावर विविध भागांत धोकादायक स्थिती असून, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. सन 2010 ते 2012 दरम्यान दौंड तालुक्यातील या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाले. रस्ता रुंद व मोठा झाला. वाहनांचा वेग वाढला. त्याचबरोबर अपघातांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जागोजागी ब्लॅकस्पॉट वाढत आहेत. दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली अशा विविध भागांत एका जागीच अनेक भीषण अपघात झाले आहेत.
कुरकुंभ व मळद यादरम्यान 7 किलोमीटर अंतरावर एका महिन्यात साधारण 3 ते 4 जणांना अपघातात जीव गमवावा लागतो. दोन वर्षांत 50 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर 60 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे मागील काही घटनांतून समोर येत आहे. असे असले तरीही पाटस टोल व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रशासनाला याचे काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. येथील सतत होणाऱ्या अपघातांबाबत पाटस टोल, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आरटीओ, स्थानिक पोलिस यांनी संयुक्तपणे उपाययोजना करण्याची गरज आहे.
कुरकुंभ हद्दीत तीन दिवसांपूर्वीच कुरकुंभ अग्निशमन केंद्र येथील कामगाराचा अपघातात मृत्यू झाला. 20 दिवसांपूर्वी केशव फुलचंद चव्हाण (वय 42) यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांचाही मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी जनावर आडवे आल्याने चारचाकी पलटी झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कुरकुंभ हद्दीत एमआयडीसी चौक आणि फौजी हॉटेलसमोरील भागात अनेक भीषण अपघात घडले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उतरताना मोठा उतार असल्याने बहुतांश वाहने भरधाव असतात. येथे हायमास्ट लाइट व इतर उपाययोजना करणे गरजेचे आहे.