हवेली पोलिस ठाणे अद्यापही हद्दीबाहेर; ब्रिटिश राजवटीपासूनचे चित्र

हवेली पोलिस ठाणे अद्यापही हद्दीबाहेर; ब्रिटिश राजवटीपासूनचे चित्र

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ब्रिटिश राजवटीपासून हवेली पोलिस ठाण्याचा कारभार हद्दीबाहेर आहे. स्वातंत्र्यास 76 वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही पोलिस ठाण्यासाठी हद्दीत जागा मिळत नसल्याचे चित्र पुढे आले आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील मामलेदार कचेरीच्या आवारात हवेली पोलिस ठाण्याचे मुख्यालय आहे. मात्र, ठाण्याचा कारभार गेल्या वीस 22 वर्षांपासून सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील अभिरुची चौकीच्या ठिकाणी सुरू आहे.

हद्दीबाहेर पोलिस ठाणे असल्याने सिंहगड, पानशेत भागांसह पश्चिम हवेली तालुक्यातील नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. ब्रिटिश राजवटीत या पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली. मुख्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि कार्यक्षेत्र मात्र शहरालगतच्या गावात, अशी स्थिती स्वातंत्र्यानंतरही कायम आहे. सभोवतालच्या कोंढवा बुद्रुक, हिंगणे, वडगाव, नर्‍हे, आंबेगाव बुद्रुक, धायरी आदी गावांची लोकसंख्या बेसुमार वाढून गुन्हेगारी वाढली आहे. या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यामुळे हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल पाच नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, मूळ हवेली पोलिस ठाण्याचा कारभार मात्र हद्दीत सुरू झाला नाही.

सिंहगड रस्त्यावरील पोलिस नांदेड सिटीपासून पानशेत धरणाजवळील आंबी गाव ते सिंहगड किल्ल्याच्या खामगाव मावळ, घेरा सिंहगडपासून खानापूर, डोणजे, खडकवासला, गोर्‍हे बुद्रुक परिसर हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. नांदेड, किरकटवाडी ते खडकवासलापर्यंत वाहतूक कोंडी, अपघात, गुन्हेगारी अशा समस्या वाढल्या आहेत. हद्दीत पोलिस ठाणे नसल्याने घटनास्थळी पोलिस यंत्रणा दाखल होणे तसेच नागरिकांना वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

हवेलीच्या हद्दीत 17 गावे आहेत. त्यातील खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, नांदोशी या गावांचा महापालिकेत समावेश झाल्याने ही गावे लवकरच शहर पोलिस आयुक्तालयात जोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणाताही निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व 17 गावे या ठाण्यात कायम आहेत. नांदेड सिटीपासून इतर ठिकाणी हद्दीत पोलिस ठाण्यासाठी जागा मिळण्यासाठी पोलिस प्रशासन अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्यापही जागा मिळाली नाही.

हद्दीतून कारभार सुरू करा

सिंहगड, खडकवासला पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. सुटीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी समस्या गंभीर झाली आहे. अपघात, अवैध धंदे, गुन्हेगारीही वाढली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी हद्दीत पोलिस ठाण्याचा कारभार सुरू करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष लहु निवंगुणे व नागरिकांनी केली आहे.

सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला डोणजे चौकाजवळ पोलिस ठाण्यासाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही या जागेची भूसंपादन प्रक्रिया झाली नाही. हद्दीत पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबत प्रक्रिया पूर्ण होईल.

– नितीन नम, सहायक पोलिस
निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news