लोणावळा : एक्स्प्रेस हायवेवरील टोलधाड थांबणार कधी? | पुढारी

लोणावळा : एक्स्प्रेस हायवेवरील टोलधाड थांबणार कधी?

लोणावळा : इंधनाची आणि वेळेची बचत तसेच सुखकर आणि सुरक्षित प्रवास, या उद्देशाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची अर्थात द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र, हा महामार्ग केवळ टोलच्या नावाखाली झोल करून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारण्याचे हे एक साधन झाला आहे. त्यामुळे ही टोलधाड थांबणार कधी? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. आगीच्या घटनेने

सुरक्षा यंत्रणांचे पितळ उघडे

सुविधांच्या नावाने वानवा असतानाच या मार्गाने प्रवास करणेदेखील सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. महिनाभरापूर्वी लोणावळ्यात एक्स्प्रेस हायवेवर एका इथेनॉल टँकरला लागलेल्या आगीच्या वेळी एक्स्प्रेस हायवेच्या सुरक्षा यंत्रणांचे पितळ उघडे पडले होते. घटना घडली त्या वेळी घटनास्थळी आयआरबीचे केवळ दोन, तेही अत्यंत छोट्या क्षमतेचे अग्निशमन बंब दिसून आले. ज्यांची क्षमता केवळ एखादी दुसरी दुचाकी किंवा छोट्या कारला लागलेली आग विझविण्यापुरती आहे. त्या ठिकाणी या यंत्रणांचा स्वतः क्रेनदेखील उपलब्ध नव्हता. पुरेसे मनुष्यबळ किंवा सक्षम यंत्रणेचीदेखील कमतरता आहे. त्यामुळे या अपघाताची धग वाढली. याचा फटका नेहमीप्रमाणे या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना बसला.

अभिनेत्री देशमुख यांनादेखील टोलच्या झोलचा फटका
अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनादेखील टोलच्या झोलचा फटका बसला. मुंबई-पुणे प्रवास करताना त्यांच्याकडून तळेगावला 80 ऐवजी 240 रुपये घेण्यात आले. तक्रार करूनही उत्तर न मिळाल्याने परतताना त्यांनी मॅनेजरला विचारले, तर सांगण्यात आले की, मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापण्यात आला. यावर ऋजुता देशमुख यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना फक्त लोणावळ्याला थांबले म्हणून दुप्पट टोल? खरेच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.

टोलचे दर आणि सुविधा यामध्ये तफावत
या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 146 कोटी इतका अपेक्षित होता. बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्त्वावर एकूण 30 वर्षे पथकर अर्थात टोल आकारून बांधकाम खर्च वसूल करण्याचा निर्णय घेत मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची निर्मिती करण्यात आली. अगदी तेव्हापासून आजतागायत टोलच्या नावाखाली या ठिकाणी अक्षरशः लूट सुरू आहे, असे म्हणायला हरकत नाही. याला मुख्य कारण म्हणजे टोलचे दर आणि त्याबदल्यात या मार्गावर उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या सुविधा, यांमध्ये असलेली तफावत. खरेतर या ठिकाणी सुविधांच्या नावाने बोंब आहे. या मार्गावर तीन ठिकाणी टोलवसुली नाके उभे करण्यात आले आहेत. एक तळेगाव येथील उर्से, दुसरा लोणावळ्यात कुसगाव टोल नाका या नावाने, तर तिसरा खंडाळा बोर घाट ओलांडल्यावर खालापूर या ठिकाणी आहे.

पोलिस मदत केंद्राची कमतरता
खरेतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेने प्रवास करताना जर काही अडचण आली, तर लोणावळा हा एकमेव पर्याय प्रवाशांच्या पुढे असतो. कारणे अनेक असू शकतात; जसे की पोटाची भूक, वॉशरूमची आवश्यकता, वाहनातील बिघाड, वैद्यकीय मदत. मात्र, भरमसाट टोल वसूल करीत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या एकूण 94.5 किलोमीटर अंतरामध्ये मुंबईकडे जाताना उर्से टोल नाका, ओझर्डे आणि ताजे येथील मॉल, त्यानंतर खालापूर टोल नाका आणि तेथील मॉल वगळता इतरत्र कुठेही खाण्या-पिण्याची तसेच टॉयलेट किंवा वॉशरूमची सोय नाही किंबहूना याहून अधिक बिकट परिस्थिती पुणेकडील बाजूला आहे. खालापूर टोल नाका आणि तेथील मॉल सोडल्यावर थेट उर्से टोल नाका आणि तेथील मॉल, अशा दोनच ठिकाणी सोय उपलब्ध आहे. शिवाय, या मार्गाने प्रवास करणार्‍या गाडीमध्ये काही बिघाड झाला किंवा क्षुल्लक गाडीचा टायर जरी पंक्चर झाला, तरी तो पंक्चर काढण्यासाठी कुठेही सुविधा या मार्गावर उपलब्ध नाही. एवढेच नाही तर संपूर्ण हायवेवर कोणत्याही स्वरूपाचे पोलिस मदत केंद्र वा वैद्यकीय मदत केंद्रदेखील उपलब्ध नाही.

Back to top button