फ्लॉवरच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसान | पुढारी

फ्लॉवरच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसान

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील शेतकरी रंगनाथ नानाभाऊ गुंड यांची फ्लॉवरच्या बोगस बियाण्यांमुळे फसवणूक झाली आहे. सध्या फ्लॉवरला बाजारभाव चांगला मिळत असताना त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, थोरांदळे गावातील घुले मळा येथील शेतकरी रंगनाथ गुंड यांनी दोन एकर क्षेत्रात लागवडीसाठी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील एका रोपवाटिकेतून 90 पैसे दराने फ्लॉवरची सुमारे 21 हजार रोपे आणून 6 जून रोजी लागवड केली. परंतु बियाणे बोगस असल्याने फ्लॉवरच्या गड्ड्यांची वाढ होत नव्हती.

रंगनाथ गुंड यांनी संबंधित रोपवाटिका चालकांना याबाबत कल्पना दिली. परंतु त्यांनी सांगितले की, हे बियाणे नामांकित कंपनीचे आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांना याबाबत सांगितले आहे, पिकाची पाहणी केली जाईल. परंतु, आठ दिवस उलटून गेले तरीदेखील कंपनीचे कोणी अधिकारी फिरकले नाहीत. त्यानंतर रंगनाथ गुंड यांनी पुन्हा विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
सध्या फ्लॉवर पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे. रंगनाथ गुंड यांनीदेखील फ्लॉवर लागवडीपासून खते, औषधे, मजुरी यासाठी मोठे भांडवल गुंतवले आहे. परंतु, कंपनीने बोगस बियाणे त्यांच्या माथी मारून त्यांचे मोठे नुकसान केले आहे.

हेही वाचा : 

मनरेगामध्ये जामखेड तालुका पुणे आणि नाशिक विभागात अव्वल; चार महिन्यात १० कोटींच्यावर खर्च

पुणे : मारहाण करत दुकानदाराला लुटले

Back to top button