सोमेश्वरने फोडली ऊसदराची कोंडी ; ऊसदरात राज्यात डंका | पुढारी

सोमेश्वरने फोडली ऊसदराची कोंडी ; ऊसदरात राज्यात डंका

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यातील ऊसदराची कोंडी फोडली असून, सन 2022-23 या हंगामात गाळप झालेल्या उसाला तब्बल 3 हजार 350 रुपये दर जाहीर केला आहे. ऊसदराची कोंडी फोडत कारखान्याने उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच एवढा दर मिळाल्याने सभासदांनी संचालक मंडळाचे आभार मानले आहेत. एफआरपीपेक्षा तब्बल 500 रुपये जास्त दर देणारा सोमेश्वर राज्यात पहिलाच कारखाना ठरला असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने हा दर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी (दि. 8) अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामध्ये गत हंगामातील उसाला टनाला 3 हजार 350 रुपये दर देण्याचा अधिकृत निर्णय संचालक मंडळाने घेतला. या वेळी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, शैलेश रासकर, आनंदकुमार होळकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. सोमेश्वरने गेल्या हंगामात तुटून गेलेल्या उसाला 2 हजार 846 रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला 54 रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना 2 हजार 900 रुपये अदा केले होते. त्यामुळे सोमेश्वरच्या सभासदांना टनाला 500 रुपये वाढवून मिळणार आहेत.

याबाबत जगताप म्हणाले की, गाळप हंगाम 2022-23 मध्ये कारखान्याने एकूण 12,56,768 मेट्रिक टनाचे गाळप केले असून, सरासरी 11 टक्के साखर उतारा राखत 14 लाख 67 हजार 950 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधून 8 कोटी 92 लाख 51 हजार 779 युनिट्सची वीजनिर्मिती केली असून, 5 कोटी 71 हजार 797 युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून 91 लाख 7 हजार 287 लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून, सोबत 41 लाख 95 हजार 984 लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. सन 2022-23 हंगामाची एफआरपी 2 हजार 850 रुपये होती, त्यावर कारखान्याने आजअखेर सभासद व बिगरसभासद यांना 2 हजार 900 रुपये प्रति मे.टनप्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यांवर वर्ग केली आहे. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

काटकसर व उत्तम नियोजनपूर्व कारभार, अजित पवार यांचे मार्गदर्शन, साखर निर्यातीचे व विक्रीचे धोरण, डिस्टिलरीमधून मिळालेले 50 कोटी रुपये उत्पादन यामुळे सोमेश्वर सर्वोच्च दर देऊ शकला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

गेल्या 5 हंगामात कारखान्याने सलग तीन हजारांहून अधिक ऊसदर दिला आहे. पुढेही कार्यक्षेत्रातील, गेटकेनधारक व सभासद यांना एकसारखाच सर्वोच्च ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहील. सोमेश्वरने संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळविला असून, यापुढील काळात सर्वोच्च ऊसदराची तसेच सभासद-बिगरसभासद एकच ऊसदराची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व सभासद शेतकर्‍यांनी यापुढील काळातही सोमेश्वरलाच ऊस घालावा.
                                    – पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना 

 

हेही वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

 बारामती : कृष्णा पेट्रोलपंप व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न करणारे दोघे जेरबंद

Back to top button