पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना आता दर महिन्याला काय कामे केली आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाले, यासंबंधीच्या प्रगतीचा अहवाल भरून द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची सोडून शिक्षकांचीच परीक्षा सुरू झाली आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये जवळपास लाखभर विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, पालिकेच्या शाळांमधील शिक्षण हा नेहमीच टीकेचा विषय ठरतो. कोट्यवधींचा खर्च करूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड असते. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने थेट शिक्षकांवर वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने महिनाभरात वर्गातील विद्यार्थ्यांना नक्की काय शिकविले, नव्याने काय उपक्रम राबविले आणि त्यावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला, यासंबंधीचा अहवाल सादर करायचा आहे. या अहवालावरून प्रत्येक शिक्षकाचे कार्यमापण प्रशासनाला करता येणार आहे. त्यात जे शिक्षक कमी पडत असल्याचे निदर्शनास येईल, त्यांना त्यांच्या कामात सुधारणा करण्यास सांगता येईल आणि त्यांचे समुपदेशनही करता येईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. या नव्या उपक्रमामुळे शिक्षकांची मात्र कसोटी लागणार असून, आता विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना आपली प्रगती राखण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
हेही वाचा :