कपड्यांना कडक इस्त्री; खिशाला बसेल कात्री  | पुढारी

कपड्यांना कडक इस्त्री; खिशाला बसेल कात्री 

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : स्वत:च्या घरी इस्त्री असूनही वेळेअभावी तुम्ही कपड्याची इस्त्री करीत नसाल किंवा टाळाटाळ करीत असाल तर ही टाळाटाळ तुमच्या खिशाला कात्री लावू शकते. कारण, इस्त्रीवाल्यांचे दर वाढल्याने त्याचा फटका खिशाला बसणार आहे.
अनेकांच्या घरी इस्त्री असूनदेखील वेळेअभावी नागरिक लॉन्ड्रीच्या दुकानात आपले कपडे इस्त्रीसाठी देतात. परंतु, आता इस्त्रीचे दर वाढले आहेत. त्यामध्ये एका कपड्यासाठी नागरिकांना आठ ते नऊ रुपये मोजावे लागत आहेत.
इस्त्री करण्यासाठी वीज वापरली जाते. त्यामुळे त्याला व्यवसाय समजून दर आकारण्यात येतो. लॉन्ड्रीचा व्यवसाय असल्याने 100 च्या वर युनिट जाते. युनिट वाढल्याने वीजबिल मोठ्या प्रमाणात येते. हे वीजबिल वसूल करण्यासाठी इस्त्रीच्या दरात वाढ केली जाते. त्याचा फटका नागरिकांना आहे.
असे आहेत दर : साडी वेगळ्या प्रकारची असल्यास कपड्यावरून दर ठरविले जातात. त्यामध्ये साडी 50 ते 60 रुपये असा दर आहे, तर नागरिकांना प्रतिड्रेस 10 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत. अनेक इस्त्रीवाल्यांकडून आठ-नऊ रुपयांऐवजी दहा रुपये घेतले जातात.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक नोकरदार, कर्मचारी मोठ्या संख्येने राहतात. वेळेअभावी ते लॉन्ड्रीला प्राधान्य देतात. पावसाळा सुरू असल्याने विविध समस्या वाढतात. पावसाळ्याच्या दिवसांत कपडे सुकत नसल्याने तारांबळ होते. त्यामुळे कपडे ड्राय करण्यासाठी 50 ते 70 रुपये मोजावे लागत आहेत.
जीवनावश्यक सर्व वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचदरम्यान आता इस्त्री करण्यासाठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता इस्त्री घरीच परवडू शकते.
– समाधान माने, नागरिक
इस्त्रीचा व्यवसाय असल्याने आमचे शंभरच्या वर युनिट जाते. त्यामुळे आमचेदेखील वीजबिल वाढते.
– हेमंत दळवी, इस्त्री व्यावसायिक

Back to top button