

कात्रज(पुणे) : रुंदीकरण रखडल्याने अरुंद झालेला रस्ता, वाढती अवजड वाहनांची वाहतूक, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, साईड पट्ट्यांवर झालेला चिखल, दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात, अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात सध्या कात्रज-कोंढवा रस्ता सापडला आहे. या रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असल्याने अपघातांत निष्पापांच्या बळींचा आकडा वाढत आहे. 'मृत्यूचा सापळा', अशी या रस्त्याची कुप्रसिद्ध ओळख महापालिका प्रशासन पुसणार केव्हा, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित
केला जात आहे.
तीन महामार्गांना जोडणारा हा प्रमुख रस्ता असून, दुतर्फा मोठी लोकवस्ती आहे. या रस्त्यावर दर तासाला सात ते आठ हजार वाहनांची संख्या असते. वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडने जीवघेणे झाले आहे. प्रशासनाने गेल्या वर्षी डांबरीकरण, दोन्ही बाजूस दहा फूट साईड पट्ट्या व दुभाजक बसविण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, ते अर्धवट झाले असून, कोट्यवधींचा निधी नागरिकांसाठी की ठेकेदारासाठी, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
या रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आणि दुरवस्थेमुळे नागरिकांचे मोठ हाल होत आहेत. ऑक्टोबर 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र, टीडीआर, एफएसआयऐवजी रोख मोबदल्याची मागणी पुढे आली. जागा हस्तांतरण रखडलेल्या रुंदीकरणाची गती मंदावली. तसेच राजकीय श्रेयवादातून आरोप-प्रत्यारोपही झाले. भूसंपादनासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने रुंदीकरण 84 मीटर ऐवजी 50 मीटर करण्याचा निणर्य महापालिकेने घेतला. राज्य सरकारने घोषित केलेले 200 कोटी रुपयांची निधी लवकर देऊन रुंदीकरणास गती देण्याची मागणी होत आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मार्चअखेर हे काम पूर्ण करण्याचा शब्द दिल्याने, तसेच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या पाहणी, भेटी व जागामालकांशी वाढता संपर्क पाहता नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अपघातांतील बळींचा वाढत चालेला आकडा पाहता प्रशासन व जागामालकांनी मोबदल्याबरोबर माणुसकीच्या नजरेतून रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दुरवस्था व अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांत वाढ
भूसंपादन होत नसल्याने रुंदीकरणाचे काम रखडले
राज्य सरकार 200 कोटी, तर पालिका 80 कोटींचा निधी देणार
तुकड्या-तुकड्यांत काम होत असल्याने समस्या सुटेना
आयुक्तांकडून येत्या मार्चअखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन
कात्रज-कोंढवा रस्त्यावर पॅरामाउंट इरोस सोसायटीसमोर नुकत्याच झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या अपघातात आदित्य लाहोटी या अभियंत्याचा मृत्यू झाला. रस्त्याच्या भूमिपूजनानंतर गेल्या पाच वर्षांत झालेल्या अपघातांत 23 निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत, तर 38 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूचे हे सत्र थांबत नसल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहत आहे.
वाढती वाहतूक कोंडी, अपघात आणि निष्पाप नागरिकांच्या बळींचे सत्र थांबणार तरी कधी? रुंदीकरणात अडचणी असतील, पण देखभाल, दुरुस्तीबाबतची उदासीनता परिसरातील नागरिकांवर हा अन्याय आहे. प्रशासनाने संयमाचा अंत पाहू नये. साईडपट्ट्या दुरुस्ती व दुभाजकाचे अवैध पंचर बंद करून रिफ्लेक्टर लावावे. मार्चअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची दिलेला शब्द आयुक्तांनी पूर्ण करावा.
– प्रतीक कदम, अध्यक्ष, प्रगती फाउंडेशन
वाहतूक कोंडी व वाढत्या अपघातांची संख्या जागा मालकांसमोर ठेवून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास यश मिळत आहे. खड्डे व साईडपट्ट्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या असून, येत्या पाच दिवसांत हे काम केले जाईल. आयुक्त लवकरच या रस्त्याची पाहणी करणार असून, हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
सुरू आहेत.– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त,
हेही वाचा