

पुणे : साखर आयुक्तालयात ऊस गाळपासह परवान्यांसाठी आणि केंद्राला अचूक माहिती देण्यासाठी कार्यरत असलेले साखर सह संचालक (विकास) हे कृषी विभागातून प्रति नियुक्तीने भरण्यात येणारे पद रिक्तच आहे. 1 ऑगस्ट 2022 म्हणजे गेल्या वर्षभरापासून हे रिक्त असून, यंदाचा ऊसगाळप हंगाम दोन महिन्यांवर आला आहे. सहकारी साखर उद्योग आणि सहकारात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्रात साखर आयुक्तालयास कृषी विभागास पद भरण्यासाठी विनंती करण्याची नामुष्की ओढवल्याने नाराजीचा सूर आहे.
संचालक पद कमी करून सह संचालक असे करण्यात आले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती सह संचालक म्हणून करण्यात आली. साखर आयुक्तालयात महत्त्वाच्या असलेल्या या पदावर साखर उद्योगाची वाढती उलाढाल आणि कामाचा व्याप पाहता संचालक दर्जाचाच अधिकारी आवश्यक आहे.
यापूर्वीचे साखर सह संचालक पांडुरंग शेळके यांची कृषी सहसंचालक (मृदसंधारण) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना झाली. 1 ऑगस्ट 2022 पासून साखर आयुक्तालयातील साखर सह संचालक (विकास) हे पद रिक्तच आहे. त्यामुळे असलेल्या या शाखेतील यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असून, सहकार विभागातील अधिकार्यांचा कृषी विभागाच्या कामकाजाचा विषय नाही. गाळपासंबंधी अहवाल सादर करणे, कारखान्यांच्या गाळप क्षमता विस्ताराचे प्रस्ताव छाननी करून शासनास सादर करणे, ऊसलागवड अनुदान अर्थसाहाय्य, ऊस विकास निधी, साखर विकास निधीअंतर्गत कारखान्यांचे प्रस्ताव सादर करणे, नियंत्रण करणे ही महत्त्वाची कामे आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, कृषी विभागाशी समन्वय साधणे, परवाना फी, नोंदणी फी, हमी फी स्वीकारणे अशा स्वरूपाच्या कामाची जबाबदारी साखर सह संचालक-विकास या पदावरील
अधिकार्यांकडे आहे.
राज्यातील ऊस गाळप हंगामाचे नियोजन, उपलब्धतेचे माहिती संकलन, कारखान्यांना परवाना देण्याकामी साखर सह संचालक-विकास हे पद महत्त्वाचे आहे. कृषी विभागाकडून हे पद प्रतिनियुक्तीने साखर आयुक्तालयात नियुक्त केले जाते. ते तत्काळ भरण्यासाठी कृषी विभागास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे पद तत्काळ भरणे आवश्यक आहे.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,
साखर आयुक्त