माजी नगराध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

माजी नगराध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : येथील एका माजी महिला नगराध्यक्षा आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात एका महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, समोरच्या महिलेसह अन्य दोघांवर या माजी नगराध्यक्षांच्या तक्रारीवरून अतिक्रमण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेच्या वादातून शनिवारी परस्पर विरोधी तक्रारीतून एकमेंकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

परस्परविरोधी गुन्हे दाखल
लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा उषा अशोक चौधरी यांच्या फिर्यादीवरून धनश्री जोशी, माया गवळी व भरत गवळी (रा. लोणावळा) व दोन अनोळखी व्यक्तींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. 5) लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यासमोरील त्यांच्या वहिवाटीमध्ये असलेल्या नगरपरिषद भूमापन क्रमांक 135 मध्ये पाच जणांनी बेकायदा जमाव जमवला. तसेच, जेसीबीच्या सहाय्याने दुकानांची मोडतोड करून आतील साहित्य अस्ताव्यस्त करून दमदाटी केली.

पिस्तुलाचा दाखविला धाक
दुसरी फिर्याद माया भरत गवळी यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून उषा अशोक चौधरी, जयराज अशोक चौधरी, दीपराज अशोक चौधरी (रा. लोणावळा) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुंगार्ली लोणावळा येथे गट नंबर 135 लगत 110 पैकी 1245 चौरस मटर शेतजमिनीवरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला होता. या शेतजमिनीमध्ये बांधलेल्या तीन टपर्‍या फिर्यादीने काढून टाकल्या होत्या. याचा राग मनात धरुन वरील तिघांनी चारचाकी वाहन फिर्यादीच्या अंगावर घातली. तसेच, पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या उद्देशाने गाडीने कट मारुन निघून गेले. तसेच, शिवीगाळ दमदाटी केली आहे. या दोन्ही परस्परविरोधी तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लाड व हवालदार लक्ष्मण उंडे हे करत आहेत.

Back to top button