मावळातील 15 हजार शेतकर्‍यांनी काढला पीकविमा | पुढारी

मावळातील 15 हजार शेतकर्‍यांनी काढला पीकविमा

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाने शेतकर्‍यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून आपल्या खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, मावळ तालुक्यातील आजअखेर 15 हजार 236 शेतकर्‍यांनी एक रुपया विमा हप्ता भरून या योजनेत सहभाग नोंदविला आहे. तसेच, 7 हजार 284 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली.

जनजागृतीचा परिणाम
कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट होती. मावळ तालुक्यात कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी, गावागावात कॅम्प, सभा, सोशल मीडिया, वृत्तपत्र, टीव्ही, शेतकर्‍यांना फोन, सिमकार्डवर मेसेज करून शेतकर्‍यांमध्ये पीकविम्याबाबत जागृती केली. त्यामुळे हे यश आल्याचे कृषी सहायक विकास गोसावी यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीपासून होणार पिकांचे संरक्षण
हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान, पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक
आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान पीक विम्यासाठी पात्र आहे. या विम्यामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळू शकेल.

महागाव, निगडेमध्ये सर्वांधिक नोंद
मावळ तालुक्यातील पीकविमा योजनेला शेतकर्‍यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून, यामध्ये प्रामुख्याने महागाव येथील सर्वाधिक 592 शेतकर्‍यांनी तर नवलाख उंबरे येथील 498 शेतकर्‍यांनी व निगडे येथील 394 शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे.

हेही वाचा :

Fashion Trend in Sari : पट्टेरी साडीची बॉलिवूड अभिनेत्रींमध्येही क्रेझ; तुम्हीही ट्राय करा

पिंपरी : महापालिका आयटीआयमध्ये स्किलसेंटर

Back to top button