फरारी दहशतवादी शाहनवाजचे छायाचित्र एटीएसकडून प्रसारित

फरारी दहशतवादी शाहनवाजचे छायाचित्र एटीएसकडून प्रसारित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचे साहित्य उपलब्ध करून देणारा साथीदार शाहनवाज पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशभरात तपास सुरू केला आहे.
कोंढव्यातील मिठानगर परिसरातून त्या दहशतवाद्याने पळ काढला होता. देशातील वेगवेगळ्या भागात एटीएसची पथके त्याचा शोध घेत आहेत. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने एटीएसकडून शाहनवाजचे छायाचित्र शुक्रवारी प्रसारित करण्यात आले.

दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (23, दोघे सध्या रा. पुणे ) यांना 18 जुलै 2023 रोजी पहाटे कोथरूड परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शाहनवाज अल सफा (31) पसार झाला. तिघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात फरार घोषित केले आहे. फरार झालेला दहशतवादी शाहनवाज याच्या शोधासाठी अन्य राज्यांतील तपास यंत्रणांचीही मदत घेण्यात येत असल्याचे एटीएस सूत्रांनी सांगितले.

युनूस आणि साकी हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून दीड वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास होते. दोघेजण शहरात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर तपासासाठी दोघांना एटीएसकडे सोपविण्यात आले. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात फरार असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणार्‍यास एनआयएने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

जयपूर प्रकरणातील गुन्ह्यातील दहशतवाद्यांचा साथीदार फिरोझ पठाण अद्याप पकडला गेलेला नाही. दहशतवादी बॉम्ब बनवण्यात निष्णात असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. शहरात घातपात घडविण्यासाठी राजस्थानमधील गुन्ह्यात सापडलेले बॉम्बचे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघे पकडले गेले. त्यानंतर शाहनवाज पसार झाला. राज्यातील वेगवेगळ्या भागात तसेच परराज्यातही शाहनवाजचा शोध घेण्यात आला.

पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज

तिघा दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांनी पकडल्यानंतर घराच्या झडतीसाठी कोंढव्यातील मिठानगर परिसरात घेऊन जाण्यात आले होते. गाडीतून उतरल्यानंतर तिघा दहशतवाद्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत साकी आणि खान या दोघांना पकडले तर शाहनवाज तेथून पसार झाला होता. पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. सध्या या गुन्ह्याचा तपास एटीएसकडून केला जात आहे. दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाचा आणि पोलिस त्यांना पाठलाग करून पकडत असतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये पोलिस त्यांना कशाप्रकारे पकडत आहेत ते दिसत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news