युवकांची मतदार नोंदणी पंधरा लाखांनी कमी

युवकांची मतदार नोंदणी पंधरा लाखांनी कमी
पुणे पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे आहे. महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के मतदार नोंदणी करावी. कारण जिल्ह्यात 18 ते 29 वर्षे वयोगटातील मतदारांची नोंदणी 12  ते 15 लाखांनी कमी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक साक्षरता मंचाच्या (ईएलसी) महाविद्यालय समन्वयक अधिकार्‍यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, 'पुढील वर्ष हे निवडणूक वर्ष असून, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कालावधीत होणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता निवडणूक प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी केवळ छापील मतदार यादी मिळायची तर आता तंत्रज्ञानातील बदलामुळे आपल्या मोबाईलवर मतदार यादी उपलब्ध आहे.
यावर्षीही विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबवताना विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांचा चांगला सहभाग अपेक्षित आहे. युवकांची मतदार नोंदणीतील उदासीनता दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.' तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिला आदी दुर्लक्षित घटकांची मतदार नोंदणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
उपजिल्हाधिकारी तांबे यांनी निवडणूक साक्षरता मंचांतर्गत पुढील काळात करण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. या अनुषंगाने लवकरच महाविद्यालयांसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस 52 महाविद्यालये, निवडणूक साक्षरता मंचाचे प्रतिनिधी, समन्वय अधिकारी, सहा महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news