नवीन पूल बांधण्यासाठी 61 वृक्ष तोडावे लागणार; पर्यावरणप्रेमींचा विरोध

नवीन पूल बांधण्यासाठी 61 वृक्ष तोडावे लागणार; पर्यावरणप्रेमींचा विरोध

कोरेगाव पार्क : पुढारी वृत्तसेवा : सेंट मिराज महाविद्यालयासमोरील साधू वासवानी पुलाची मुदत संपल्याने या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या कामासाठी रस्त्याकडेला असलेली सुमारे 61 झाडे तोडण्यात येणार आहेत. याला वृक्षप्रेमींनी कडाडून विरोध केला आहे. कोरेगाव पार्क परिसरातील पेट्रोल पंपपासून ते बार्टी कार्यालयादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे 161 झाडे आहेत. या ठिकाणी वडाचे जुने वृक्ष गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना सावली देत आहे. मात्र, साधू वासवानी पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याने परिसरातील 61 झाडे काढली जाणार आहेत. यामध्ये नऊ वृक्ष पूर्णतः काढली जाणार असून, 52 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

'चलो पीएमसी, पुणे संवाद' या पर्यावरणप्रेमी ग्रुपने या ठिकाणी होणार्‍या वृक्षतोडीला विरोध केला आहे. पर्यावरणप्रेमीसोबत सहायक उद्यान अधीक्षक गुरुदास तुमाले, हॉर्टिकल मिस्त्री अशोक आटोळे, प्रकल्पाचे शाखा अभियंता रणजीत मुटकुळे आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली. सहायक उद्यान अधीक्षक गुरुदास तुमाले म्हणाले, 'वडाची जुने वृक्ष वाचविण्यात येणार आहेत. मात्र, 9 वृक्ष पूर्णतः तोडले जाणार असून, 52 वृक्ष काढून त्याचे पुनर्रोपन केले जाणार आहे.'

शहरात जवळपास 50 पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, वाहतूक कोंडी कमी झाली नाही. या ठिकाणी वाहतूक कोंडी होत नसताना पूल बांधला जाणार आहे. महापालिकेला पूल बांधायचा असेल, तर लोखंडी पूल बांधावा आणि वृक्ष वाचवावेत, अशी आमची मागणी आहे.

-अमित सिंग, पर्यावरणप्रेमी.

साधू वासवानी पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तो नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आहे. पुलाच्या बांधकामात काही वृक्ष अडथळा ठरत असल्याने ते काढावे लागणार आहेत. या बदल्यात नव्याने वृक्षलागवड केली जाणार आहे.

-रणजीत मुटकुळे, प्रकल्प शाखा अभियंता, महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news