टोमॅटोला बाजारभाव; मात्र पीकच उपलब्ध नाही | पुढारी

टोमॅटोला बाजारभाव; मात्र पीकच उपलब्ध नाही

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : टोमॅटो पिकाला सध्या उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. परंतु, टोमॅटोचे पीकच उपलब्ध नसल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यात दिसून येत आहे. ज्यांच्याकडे पीक आहे ते अद्याप फुलोर्‍यातच आहे. सध्याचा बाजारभाव भविष्यातही राहावा, अशी अपेक्षा या शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून टोमॅटो पिकाला बाजारभावाची साथ मिळालीच नाही. शेतकर्‍यांनी गुंतविलेले लाखो रुपयांचे भांडवल वाया गेल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अक्षरश: कर्जबाजारी बनले होते. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांनी टोमॅटो पिकाकडे काणाडोळा केला.

यंदा काही शेतकर्‍यांनी उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक घेतले. परंतु. चांगला बाजारभाव मिळालाच नाही. टोमॅटो फेकून द्यावे लागले. त्यानंतर मात्र बाजारभावात वाढ होत गेली. दोन दिवसांपूर्वी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील टोमॅटो बाजारात क्रेटला (20 किलो) 130 रुपये बाजारभाव मिळाला. हा बाजारभाव गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच मिळाला आहे. टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असला, तरी शेतकर्‍यांकडे टोमॅटोचे पीकच नसल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांकडे आहे ते पीक अद्याप फुलोर्‍यातच आहे. अजून बागबांधणीदेखील झालेली नाही. टोमॅटो काढणीला येताच बाजारभाव कमी होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button