द्राक्षबागांसाठी प्लाास्टिक कव्हरचा 8 जिल्ह्यांत प्रकल्प | पुढारी

द्राक्षबागांसाठी प्लाास्टिक कव्हरचा 8 जिल्ह्यांत प्रकल्प

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (आरकेव्हीवाय) गारपीट, अवकाळीपासून द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी ‘प्लास्टिक कव्हर’ तंत्रज्ञान योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 100 हेक्टर क्षेत्राचा हा प्रकल्प असून, खर्चाच्या 50 टक्क्यांइतके अनुदान शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी आरकेव्हीवायमधून 6 कोटी 14 लाख 4 हजार रुपयांइतक्या अनुदान निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी ‘महाडीबीटी’ प्रणालीव्दारे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना 20 गुंठे ते 1 एकरदरम्यान प्रतिलाभार्थी अनुदानाचा लाभ मिळेल. प्रतिएकरसाठी सुमारे 4 लाख 81 हजार 344 रुपये खर्चाचा अंदाज असून, अनुदानाची मर्यादा ही खर्चाच्या 50 टक्के म्हणजे 2 लाख 40 हजार 672 रुपये प्रतिएकर मंजूर आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी : महाडीबीटी पोर्टल https:// mahadbt. maharashtra. gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी
केले आहे.

आवश्यक कागदपत्रे

योजनेत सहभागासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ उतारा, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शेतकर्‍यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा आदींची आवश्यकता आहे.

Back to top button