पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार आठ वर्षांनी एकाच व्यासपीठावर | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार आठ वर्षांनी एकाच व्यासपीठावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी (1 ऑगस्ट) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौर्‍यामध्ये त्यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह विविध प्रकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आठ वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौर्‍यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आरती करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केली जाणार आहे. त्यानंतर, दुपारी 12 : 45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत मेट्रो रेल्वे मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडीसारखी म्हणजेच ज्याला मावळा पगडीदेखील म्हटले जाते, त्यासारखी आहे. शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचर्‍यापासून ऊर्जा निर्माण करणार्‍या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीजनिर्मिती केली जाईल.

पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिगजांमध्ये डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन आदींचा समावेश आहे.

घरांचे हस्तांतर अन् भूमिपूजन
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरेदेखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणार्‍या 6400 हून अधिक घरांची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Back to top button