पुणे : दहशतवाद्यांनी वापरलेला ड्रोन एटीएसला सापडला | पुढारी

पुणे : दहशतवाद्यांनी वापरलेला ड्रोन एटीएसला सापडला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडे ड्रोनचे साहित्य व रिकामा ड्रोनचा बॉक्स सापडला होता. मात्र रिकाम्या बॉक्समधील ड्रोनचा शोध घ्यायचा असल्याने दोन दहशतवाद्यांना पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती. तोच ड्रोन आता राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागला असून त्याच ड्रोनच्या आधारे त्यांनी जंगलासह इतर ठिकाणची रेकी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या चौघांकडून एटीएसने तब्बल 500 जीबी डाटा जप्त केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.

गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट मिळाले असून, यात पुण्यासह मुंबईतील छाबड हाऊसचा देखील समावेश असल्याच्या वृत्तालाही एटीएसने दुजोरा दिला आहे. पुणे पोलिसांच्या कोथरूड बीट मार्शलवरील कर्मचार्‍यांनी गस्तीत दुचाकी चोरीच्या संशयातून मोस्ट वॉन्टेड दहशतवादी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय 23), महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय-24, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली. दरम्यान, पुण्यात या दोघांना आश्रय देणार्‍या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32, रा, कोंढवा) याला तर, नुकतीच या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून सिमाब नसरूद्दीन काझी (वय 27, कौसरबाग, कोंढवा) मुळ. पंढेरी, रत्नागिरी) याला अटक झाली आहे. त्याच्याकडील चौकशीत त्याने रोख व ऑनलाईन अशी पैशाची मदत केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. दहशतवाद्यांकडे सापडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटची पडताळणी केल्यानंतर मोबाईल व लॅपटॉपमध्ये गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट आढळले आहेत. ज्यात पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणे निष्पन्न झाली असून तेथील रेकी केल्याला व मुंबई येथील छाबड हाऊसचा ही फोटो आढळच्या वृत्ताला मीना यांनी दुजोरा दिला. त्यांच्याकडे सापडलेले ड्रोन हे विविध जागेचे चित्रीकरण करण्यासाठी वापरले असल्याचेही समोर आले आहे.

बॉम्ब बनविण्याच्या सर्किटसह इतर साहित्य जप्त

आरोपींकडे बॉम्ब बनविण्याचे सर्किट तसेच विविध प्रकारचे पुस्तक, युट्यूबवरील व्हिडीओ आणि काही पीडीएफ फाईलही दहशतवाद्यांकडे सापडल्या आहेत. फरार झालेल्या त्यांच्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. परंतु, अद्याप तो कोणत्याही यंत्रणेला सापडलेला नाही. राज्यात तसेच परराज्यात दहशतवाद विरोधी पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, यामध्ये आणखी आरोपी देखील निष्पन्न होत असल्याचे असल्याचे मीना यांना स्पष्ट केले.

नाव बदलून फिरत होते

रतलाम येथील गुन्ह्यात फरार झाल्यानंतर दोघेही आरोपी आपली नावे लपवून बनावट कागदपत्रांच्या आधारे आपली ओळख लपत व बनावट नाव धारण करून पुण्यात राहत होते. अटक करण्यात आलेले दहशतवादी वेलट्रेन्ड असल्याचे एटीएसच्या वतीने सांगण्यात आले. आपली ओळख पटू नये यासाठी आरोपी जेथे रेकी करायला जातील तेथील परिसरातील हॉटेलमध्ये वास्तव्य न करता टेन्ट टाकून वास्तव्य करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

Back to top button