पारगाव : पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसाचा फटका आरणीत साठवलेल्या कांद्याला बसला आहे. कांदे सडण्याचे प्रमाण खूपच वाढल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांनी कांदे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवायला सुरुवात केली आहे. गेली पंधरा दिवसांपासून तालुक्याच्या पूर्व भागात रिमझिम पाऊस पडत आहे. पावसामुळे आरणीत साठविलेले कांदे सडण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यात प्रचंड उष्णता होती. त्याचाही फटका कांद्यांना बसून कांदे सडले. आता रिमझिम पावसाचादेखील फटका बसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यंदा कांदा काढणीपासूनच कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळालेला नाही. मध्यंतरी कांद्याला बाजारभाव वाढले. बाजारभावात आणखी वाढ होईल, या आशेने पुन्हा शेतकर्यांनी कांदा साठवणे पसंत केले. परंतु, आता आरणीतील कांदे सडण्याचे प्रमाण वाढले आहे.
चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला 150 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. परंतु, अनेक शेतकर्यांकडे खराब झालेले कांदे आहेत. त्यामुळे बाजारभावदेखील कमी मिळत आहे. रांजणी परिसरात कांदे सडू लागल्याने शेतकर्यांनी कांदे पिशव्यांमध्ये भरून बाजारपेठेत पाठवायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा :