पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळ परिसरात उभारण्यात येत असलेल्या नव्या कार्गो टर्मिनलचे काम आता पूर्ण झाले असून, ते पूर्ण होऊन सुरू कधी होणार? त्याचे उद्घाटन कधी होणार? असे सवाल पुणेकरांकडून केले जात आहेत. या नवीन कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीत दुप्पट वाढ होणार असल्यामुळे मोठी उत्सुकता लागली आहे.
विमानतळावरून मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. मालवाहतुकीचे जुने कार्गो टर्मिनल अपुरे पडत होते. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने येथे मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्यात आले आहे. मात्र, ते अद्याप सुरू झालेले नाही. गेल्या मे महिन्यात हे कार्गो टर्मिनल सुरू होईल, अशी पुणेकरांना अपेक्षा होती. मात्र, दोन महिने उलटूनही ते सुरू होण्याला मुहूर्त लागलेला नाही. या कार्गो टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून, ते कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
टर्मिनलसाठी वायुदलाची मदत
भारतीय हवाईदलाने पुणे विमानतळ प्रशासनाला या कार्गो टर्मिनल उभारण्यासाठी मोठी मदत केली आहे. येथीलच 1.76 एकर जागा हवाईदलाने विमानतळ प्रशासनाला कार्गो टर्मिनलसाठी दिली. त्याच जागेवर आता हे कार्गो टर्मिनल उभारण्यात आले आहे.
पुण्यातून विमानाने प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. पुणे विमानतळावरील कार्गो टर्मिनल सुरू झाल्यामुळे यामध्ये दुपटीने वाढ होणार आहे आणि व्यापार्यांसह शेतकर्यांनादेखील मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तातडीने येथील नवीन कार्गो टर्मिनल सुरू करावे.
– अरविंद मोरे, व्यापारी